Pune Crime: मजुरीचे १०० रुपये देण्यास नकार दिल्याने केला मामाचा खून; पसार भाच्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:48 AM2023-08-05T11:48:05+5:302023-08-05T11:49:01+5:30
अटक करण्यात आलेल्या आरोपीने दारूच्या नशेत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे...
पुणे : मजुरीचे १०० रुपये देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केला. त्यानंतर पसार झालेल्या भाच्याला कोंढवा पोलिसांनी नांदेडमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने दारूच्या नशेत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
अनंत शंकरराव काळगिरे (४५, रा. हनुमाननगर, पिसोळी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी भाचा सचिन राम येनलवाड (रा. हनुमाननगर, पिसोळी) याला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत अनंत काळगिरे आणि आरोपी सचिन येनलवाड यांनी सोबत मजुरीचे काम केले होते. मजुरीचे अर्धे पैसे मागितले असता मामा अनंत याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी रागाच्या भरात दारू पिऊन भाच्याने मामाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारत गंभीर जखमी केले. यानंतर सचिन नांदेड येथे पळून गेला. दरम्यान, जखमी अनंत याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी देगलूर, जि. नांदेड येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कोंढवा पोलिस ठाण्यातील तपास पथकाने देगलूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन शेतात लपून बसलेल्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मजुरीचे पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात डोक्यात रॉड मारून जखमी केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त परिमंडळ- ५ विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस अंमलदार सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सागर भोसले, सूरज शुक्ला आणि अनिल बनकर यांच्या पथकाने केली.