सख्या मामाने ९ वर्षाच्या भाचीवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:33 PM2019-12-23T21:33:09+5:302019-12-23T21:35:23+5:30
९ वर्षाची असलेल्या पिडीत मुलीने धाडसाने १०० नंबरवर पोलीसांना फोन करत आपबीती सांगितली. पोलिसांनीही तातडीने दखल घेत आरोपी मामाला अटक केली. नात्याला काळीमा फासणा-या घटनेने खळबळ उडाली आहे.
पुणे (मंचर) : आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे सख्या मामाने आपल्या अल्पवयीन भाचीवर जबरदस्ती करून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ९ वर्षाची असलेल्या पिडीत मुलीने धाडसाने १०० नंबरवर पोलीसांना फोन करत आपबीती सांगितली. पोलिसांनीही तातडीने दखल घेत आरोपी मामाला अटक केली. नात्याला काळीमा फासणा-या घटनेने खळबळ उडाली आहे.
मंचरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ वर्षाच्या अल्पवयीन पीडीत मुलगी आणि तीचा ४ वर्षांचा भाऊ आई सोडून गेल्याने आपल्या आजी आजोबांकडे राहत होते. वडील पुण्यात मजुरीचे काम करतात. आई वडील येथे नसल्याने आजी आजोबा दोघांच पालन पोषण करत होते. आजी आजोबा दिवसभर शेतात काम करत होते. आरोपी मामा दुपारच्या वेळी कोणी घरी नसताना भाचीवर बलात्कार करत होता. एक महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मध्यंतरी मुलीचे पोट या कारणाने दुखत होते. या मामाने तिला स्थानिक डॉक्टरकडे नेले. कुणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी भीतीने गप्प राहिली. कुणाचा आधार नसल्याने ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मामाने ४ वेळा घरी कोणी नसताना असा प्रकार केला. १२ डिसेंबरला घरात लहान भाऊ झोपला असताना मामाने बलात्कार केला.
घाबरलेल्या मुलीने रविवारी (दि २२) आजोबांचा फोन घरी राहिला हे पाहिले. धाडस करून या मुलीने मोबाईलवरून १०० नंबर डायल करत पोलिसांना संपर्क केला, आणि अत्याचाराला वाचा फोडली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी ताबडतोब या घटनेची दखल घेत, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, विठ्ठल वाघ, नवनाथ नाईकडे, विशाल चितारे, रामदास तनपुरे यांनी या नराधम मामाला अटक केली. न्यायालयाने आरोपीस २७ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. नात्याला काळीमा फासणा-या या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. पोलीस उप निरीक्षक अर्जुन शिंदे पुढील तपास करीत आहेत.
मंचर पोलीस ठाणे मार्फत एक महिन्यापासून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस नाईक विनोद गायकवाड हे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जाऊन मार्गदर्शन करत आहे. मार्गदर्शन करताना ते त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व पोलीस स्टेशनचा नंबर देतात.जर कोणी त्रास देत असेल तर फोन करून आम्हाला कळवा असे आवाहन ते करत आहे. यामुळेच या छोट्याशा मुलीने शंभर नंबर फिरवून आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा पोलिसांपर्यंत पोहोचवली असेल अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.