अस्वच्छ हॉटेलची माहिती लोकहितविरोधी! : एफडीए; व्यापक लोकहीत नसल्याचे सांगितले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:02 PM2017-12-07T18:02:02+5:302017-12-07T18:05:30+5:30
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोणत्या हॉटेल्सवर अस्वच्छतेच्या कारणांवरुन कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला आहे.
पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोणत्या हॉटेल्सवर अस्वच्छतेच्या कारणांवरुन कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला आहे. व्यापक लोकहिताच्या दृष्टीने ही माहिती देता येणार नसल्याचे उत्तर एफडीएने दिले आहे.
शहरातील किती हॉटेल्स, केटरर्सची माहिती एफडीएकडून मागविण्यात आली होती. यातील किती आस्थापनांची आरोग्य व स्वच्छतेबाबत तपासणी केली. कारवाईतील दोषी हॉटेल्सवर कोणती कारवाई केली, त्यांची नावे आणि दंडाची रक्कम याची माहिती मागविण्यात आली होती. त्याला उत्तर देताना एफडीऐने शहरात २ हजार २४८ हॉटेल्स व केटरर्सना परवाने दिले असल्याचे सांगितले. मात्र कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, त्यांना किती दंड ठोठावला, तपासणी अहवालाची प्रत याची माहिती देण्यास नकार दिला.
कारवाई केलेल्या हॉटेल्सची माहिती दिल्यास संबंधित आस्थापनांच्या स्पर्धात्मक स्थानाला तपासणी अहवालातील मुद्द्यांमुळे हानी पोहोचू शकते. तसेच तपासणी अहवालातील काही मुद्द्यांवर न्यायालयात खटले सुद्धा दाखल झाले आहेत. त्यामुळेच व्यापक लोकहिताच्या दृष्टीने अशी माहिती आवश्यक असल्याचे दिसून येत नसल्याने ही माहिती नाकारण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण एफडीएच्या पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी माहिती अधिकारात दिले आहे.
हॉटेलांच्या तपासणीची माहिती एफडीए कार्यालयाने स्वत:हून जाहीर केली पाहीजे. हॉटेल्स अथवा केटरर्स अस्वच्छ आणि रोगराई पसरविणाऱ्या वातावरणात खाद्यपदार्थ करत असतील, तर त्यांची माहिती उघड करायला हरकत घेण्याची गरज नाही. उलट माहिती जाहीर करणे व्यापक लोकहीताचेच आहे. माहिती नाकारण्यासाठी वापरलेली ही युक्ती आहे. त्या विरोधात माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी सांगितले.