स्टेडिअम परिसरात अस्वच्छता
By admin | Published: April 25, 2016 01:15 AM2016-04-25T01:15:10+5:302016-04-25T01:15:10+5:30
गहुंजे येथील क्रिकेट स्टेडिअम परिसरात सामन्याच्या वेळी अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असून, त्याचा त्रास शेतकरी आणि ग्रामस्थांना होत आहे.
देहूरोड : गहुंजे येथील क्रिकेट स्टेडिअम परिसरात सामन्याच्या वेळी अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असून, त्याचा त्रास शेतकरी आणि ग्रामस्थांना होत आहे.
शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या नवव्या सत्रातील सामन्यांसाठी विविध कामांसाठी शेकडो कामगार आले होते. प्रेक्षकांसाठी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ विक्रीसाठी विविध भागांतून आलेले विक्रेते व त्यांचे कामगार आले होते. त्यांनी गेल्या
तीन दिवसांत स्टेडिअम
नजीकच्या गहुंजे परिसर, शेतात, पायवाटा व लहान-मोठ्या रस्त्यांवर प्रातर्विधी उरकल्याने सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
गहुंजेतील निर्गुण बोडके, आनंदा बोडके, सचिन बोडके, तसेच अन्य काही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गहुंजेतील स्टेडिअमवर पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यासाठी परिसरात विविध भागात विविध ठिकाणी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था व त्यासाठी आणण्यात आलेली जनरेटर सुविधा असणारी सुमारे पन्नास वाहने, त्यावरील सुमारे दोनशे कामगार, सामन्यांसाठी येणाऱ्या हजारो प्रेक्षकांसाठी सामन्याच्या दरम्यान पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते, तसेच त्यांचे कामगार, सामन्यांच्या वेळी स्टेडिअममध्ये विविध कामांसाठी आणलेले सुमारे तीन-चारशे कामगार, त्यांचे कुटुंबीय यांना स्टेडिअम परिसरात मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे सर्वांनी गहुंजे गावाच्या परिसरातील गावठाणाकडे व
शेताकडे जाणारे सर्व लहान-मोठे
रस्ते, पायवाटांवर तसेच शेतात प्रातर्विधी उरकल्याचे ओंगळवाणे चित्र दिसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
एखाद- दुसऱ्या शेतकऱ्याने कामगार व विक्रेत्यांना मज्जाव
करीत हाकलून लावण्याच्या प्रयत्न केला असता, संख्येने अधिक असलेले महिला व पुरुष कामगार शेतकऱ्यांवर गुरकण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
याबाबत स्टेडिअम व्यवस्थापनाशी संपर्क साधला
असता, येथील देखभाल पाहणारे अभियंते कुदळे यांनी मला काहीही माहिती नाही, असे सांगितले. त्यांना पुन्हा संपर्क करून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मोबाइल उचलला नाही. (वार्ताहर)