नीरा रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:56 PM2018-08-28T23:56:09+5:302018-08-28T23:56:34+5:30
नीरा : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वे प्रशासनाने पार्किंगची जागा उपलब्ध केली असली तरी अस्ताव्यस्त गाड्या लावल्याने दररोज प्रवाशांमध्ये तू-तू मै-मै होत आहे. रेल्वे प्रवाशांव्यतरिक्त लोक गाड्या पार्किंग करून जात असल्याने नाहक गर्दी वाढत आहे. पार्किंगच्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत.
पुण्याचे उपनगर म्हणून नीरा (ता. पुरंदर) शहराची ओळख होऊ लागली आहे. दररोज सकाळी परिसरातील शेकडो प्रवासी पुणे, मुंबई, सातारासह इतर ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. परिसरासह नीरा शहरातील लोक दुचाकी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात. दिवसभर मोटारसायकल पार्किंगमध्ये लावलेली असते. संध्याकाळी ती घेऊन जातात. परंतु येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली नाही. रेल्वे प्रशासनाने फक्त पार्किंगसाठी जागा निर्माण केली. पण मोटारसायकली रामभरोसे सोडून कामावर जावे लागते. नियमित प्रवासी त्यांच्या मोटारसायकली रांगेत व्यवस्थित लावतात. पण थोड्या वेळासाठी किंवा प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक अस्ताव्यस्त गाड्या लावतात. त्यामुळे गाड्या काढताना कुरबुरी नित्याच्या झाल्या आहेत. नीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी येतात. खाजगी रुग्णालय, बँक, पतसंस्थांसह व्यावसायिकांच्या दारासमोर वाहने चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेली असतात.
पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारण्याची मागणी
केवळ आठवडी बाजारात वाहन चालकांवर कारवाई करत किरकोळ १०० रुपयांचा दंड करण्यापेक्षा वाहतुकीत शिस्त यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. धनदांडग्यांच्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने आपसूकच बेशिस्त पार्किंगची समस्या वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाने पार्किंगच्या जागेत योग्य त्या सुविधा देणे गरजेचे आहे.