पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांना बिनशर्त परवानगी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:23 PM2020-05-04T15:23:05+5:302020-05-04T15:25:49+5:30
जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग- धंदे व कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा
पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील,असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. यामुळे गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग- धंदे व कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हा पासून पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व अन्य क्षेत्रातील सर्व उद्योग-धंदे, कारखाने व खाजगी आस्थपना बंद आहेत.परंतु 3 मे पासून राज्यात प्रतिबंधित क्षेत्राताबाहेर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचा?्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ?रेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
-----
- पुणे जिल्ह्यात एकूण उद्योग-धंदे, कारखाने (युनिट) : 2 लाख 33, 725
- जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील युनिट : 4 हजार 628
- एमआयडीसी क्षेत्रा बाहेरील युनिट : 2 लाख 29 हजार 97
............................
ग्रामीण भागात सरसकट सर्व दुकाने सुरू होणार
राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील रेड झोन क्षेत्राशिवाय अन्य सर्व भागात सरसकट सर्व दुकाने सुरू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारिया यांनी लोकमतला दिली. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून ठप्प असलेल्या सर्व बाजार पेठा पुन्हा सुरू होणार आहेत.
पुणे जिल्ह्यात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. यामुळे येथे रूग्णांच्या संख्येनुसार कन्टमेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. परंतु जिल्ह्यात ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेक तालुके रेड झोनमधून बाहेर देखील आले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सर्व निर्बंध उठवण्यात आले असल्याचे कटारिया यांनी स्पष्ट केले.