मतभेद विसरून निवडणूक बिनविरोध
By Admin | Published: July 25, 2015 04:56 AM2015-07-25T04:56:53+5:302015-07-25T04:56:53+5:30
: हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे
पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी मतभेद विसरून ती निवडणूक बिनविरोध केली.
विशेष म्हणजे या गावचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. गावातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र बसून आपापसांतील मतभेद विसरून गावची निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
अष्टापूर ग्रामपंचायतीसाठी एकूण चार प्रभाग असून यामध्ये छाया प्रकाश जगताप, नितीन अंकुश मेमाणे, लक्ष्मी संदीप मलाव, सुनंदा कांतिलाल कोतवाल, सुभाष चंद्रकांत जगताप, रुक्मिणी सुरेश कोतवाल, आत्माराम बबन कोतवाल, चंद्रभागा दिलीप कोतवाल, दत्तात्रय शांताराम कोतवाल, सुनीता संतोष कोतवाल, संतोष भाऊसाहेब निकाळजे यांचा बिनविरोधमध्ये समावेश आहे.
अष्टापूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी एकूण ३० अर्ज आले होते. त्यापैकी तब्बल १९ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध करणे सोपे झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुणे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जगताप, हवेली पंचायत समिती माजी सदस्य सुभाष जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, सुखदेव कोतवाल, सूर्या ग्रुपचे चेअरमन बाळासाहेब भोसले, माजी सरपंच रमेश कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल, शामराव कोतवाल, तयाजी जगताप, अरविंद कोतवाल, ज्ञानोबा कोतवाल, पांडुरंग कोतवाल, आबा कोतवाल, कोंडिबा कोतवाल, बाजीराव कोतवाल, विकास कोतवाल, सुभाष कोतवाल, पंढरीनाथ कोतवाल, शिवाजी कोतवाल, राजेंद्र कोतवाल, कैलास कोतवाल, रामदास कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल आदींनी प्रयत्न केले.
सासवड : पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकांमधील बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे व पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याबरोबरच २६ ग्रामपंचायतींमधील ६६ जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या एकूण ४४१ जागांसाठी मतदान होईल. या प्रक्रियेमध्ये एकूण १,६७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ५५९ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एकूण १,००६ जणांचे अंतिम अर्ज राहिले असून, ४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी १३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. १३ ते २० जुलै या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. एकूण ६२ ग्रामपंचायतींसाठी ५४८ उमेदवार निवडण्यात येणार होते. यासाठी एकूण २०६ प्रभाग निश्चित करण्यात आले होते. स्त्री मतदार ५५,१८७ व पुरुष मतदार ६०,१३२ असे एकूण मतदार १,१५,३१९ इतके होते. अर्ज दाखल करण्याच्या काळात एकूण १,६७३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तसेच अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १,६७३ पैकी ५५९ जणांनी तडजोड करून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण १,००६ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.
एकूण ६२ ग्रामपंचायतींपैकी बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे, पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५७ ग्रामपंचायतीं साठी मतदान घेण्यात येईल. त्याचप्रमाणे एकूण ६२ ग्रामपंचायतींमधील ५ बिनविरोध ग्रामपंचायती धरून ५४८ पैकी ४४१ जागांसाठी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.