अघोषित भारनियमन
By admin | Published: March 22, 2017 03:09 AM2017-03-22T03:09:01+5:302017-03-22T03:09:01+5:30
मावळात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न काही दिवसांपासून गंभीर बनला असून, कामशेतसह मावळातील अनेक भागात वारंवार वीज
कामशेत : मावळात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न काही दिवसांपासून गंभीर बनला असून, कामशेतसह मावळातील अनेक भागात वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महावितरणच्या या अघोषित भारनियमनामुळे, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची
चाहूल लागली असून, दिवसेंदिवस उकाड्याचे प्रमाण वाढतच
चालले असल्याने त्यात बत्ती
गुलमुळे नागरिकांना घरामध्ये थंडावा देणारी विजेची उपकरणे बंद पडत आहेत.
ऐन उन्हाळ्यात वारंवार ठरावीक वेळेत वीज जाण्याच्या घटनांमुळे नागरिक व व्यावसायिकांचे मोठे हाल होत असून, अनेकदा वीज कमी दाबाची असल्याने घरातील व व्यावसायिक उपकरणे चालत नाहीत. उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असताना घरातील पंखे, कुलर विजेविना बंद पडत आहेत.
या विषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उन्हाळ्याच्या दिवसांत वीज वापराचे प्रमाण वाढत असून, अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर यांच्यावर अतिरिक्त भर येऊन वीजपुरवठा बंद होत आहे असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)