पेठांमध्ये अघोषित पाणीकपात
By admin | Published: December 24, 2014 01:33 AM2014-12-24T01:33:48+5:302014-12-24T01:33:48+5:30
स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली.
पुणे : स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने तातडीने हाती घेतले असले, तरी त्यासाठी आणखी वेळ जाणार असल्याने उद्या (बुधवारी) या जलवाहिनीवर अवलंबून असणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
स्वारगेट चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून खांबासाठी खोदकाम सुरू आहे. या परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या जात असल्याने हे काम करताना, काळजी घेण्याची विनंती महापालिकेकडून पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास वारंवार करण्यात आली आहे. हे पत्र दिले असतानाही यापूर्वी तीन वेळा या ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. मात्र, आज दुपारी पुन्हा तोच प्रकार घडला. दुपारी तीनच्या सुमारास खोदकाम सुरू असताना, भवानी पेठ परिसर पेठांच्या प्रमुख भागास पर्वती जलकेंद्रातून पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली. या वेळी जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू असल्याने या ठिकाणी काही सेकंदातच पाण्याचे उफळे सुरू होऊन अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण चौकात गुडघाघर भर पाणीसाचले. (प्रतिनिधी)