पुण्यातील स्थिती नियंत्रणात, पूर्ण लॉकडाऊन करणे योग्य नाही : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:40+5:302021-03-24T04:10:40+5:30
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे़ त्यामुळे शहरात पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करणे ...
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे़ त्यामुळे शहरात पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करणे योग्य नाही़, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे़
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रूग्णवाढ असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याबाबतचे संकेत मुंबईत बोलताना दिले होते़ या पार्श्वभूमीवर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी, कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टाटा व आयसर या संस्थांच्या सर्व्हेनुसार, सध्या आपण जे निर्बंध लावले आहेत त्याची अधिक कडक अंमलबजावणी करणे आता गरजेचे बनल्याचे सांगितले़ तसेच या निर्बंधांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल पण पूर्णत: लॉकडाऊन हा त्यावरील मार्ग नसल्याचे सांगितले़
शहरातील रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महापालिका तीन आघाडीवर काम करणार आहे़ यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारून, रूग्णांना बेडची उपलब्धता करून देणे, जास्तीत जास्त संशयित व्यक्तींची तपासणी करणे़ याचबरोबरच निर्बंधांची कडक अंमलबजावणी करून अधिकचे निर्बंध आणणे व लसीकरणाचा वेग वाढविणे यांचा समावेश असल्याचे मोहोळ यांनी सांगितले़