बनावट ऑईल, सीड्स विकत घेण्याच्या बहाण्याने सव्वाकोटी रुपयांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:59+5:302021-07-28T04:09:59+5:30
पुणे : अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईलला चांगली मागणी आहे. त्या व्यवसायासाठी ऑईल व सीडस खरेदी करण्यास भाग पाडून सव्वाकोटी रुपयांना ...
पुणे : अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईलला चांगली मागणी आहे. त्या व्यवसायासाठी ऑईल व सीडस खरेदी करण्यास भाग पाडून सव्वाकोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी राजू मनसुख रुपारेलिया (वय ५६, रा. ढोले पाटील रोड, बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते मे २०१९ दरम्यान घडला. सायबर पोलिसांनी मारिया, गीता शर्मा, डॉ. जेम्स विल्यम, मॉरीसन, संगीता शर्मा, पामिला राईस, ईरटीया अशी नावे सांगणा-यांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांची एका सोशल मीडियावर मारीया नावाच्या तरुणीशी ओळख झाली. काही दिवस चॅटिंग केल्यावर तिला फिर्यादीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिने अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी आहे. त्याचा आपण व्यवसाय करू असे सांगितले. त्यानंतर तिने आपल्या इतर सहका-यांना संपर्क साधायला लावला. त्यांनी ब्रिटन येथून त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे भासविले. त्यामुळे त्यांना हा सर्व प्रकार खरा वाटला. ऑईल व सीडस खरेदी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. ते जास्त दराने विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एकूण १ कोटी २४ लाख २८ हजार ६०८ रुपये भरायला लावले. इतके पैसे भरल्यानंतरही त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांनी संपर्क तोडला. त्यानंतर फिर्यादी हे त्यांना शोधण्याचा गेल्या दोन वर्षे प्रयत्न करीत होते. शेवटी ते न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी तपास करीत आहेत.