धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी आले पाण्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 07:30 PM2019-06-06T19:30:18+5:302019-06-06T19:34:15+5:30
उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.
भोर : उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, रस्ता, पीठ गिरणी, शाळा, बसथांबा, ग्रामदैवत, पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पुर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीरा नदीचा उगम आहे. धरण बांधण्याच्या आधी नीरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती. इतिहासात हिरडस मावळ या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती. कोकणाला जोडणारा वरंध घाट या भागातून जातो. डोंगरात प्रामुख्याने हिरडा, आईन, शिसव, सागवान यांची झाडे अधिक आहेत. मात्र, हिरड्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘हिरडस मावळ’ नाव मिळाले असल्याचे येथील इतिहास संशोधक सुरेश शिंदे यांनी सांगितले.
सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने नीरा नदीवर नीरा-देवघर धरण बांधले. त्यानंतर नीरा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावातील नागरिक विस्थापित झाले. त्याच वेळी हिरडोस मावळातील महत्त्वाचे असलेले व्यापारी हिर्डोशी गावही विस्थापित झाले. नीरा-देवघर धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे धरणात गेलेले हिर्डोशी गाव जवळपास २० वर्षांनंतर पाण्याबाहेर आले आहे.
गावाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत. त्या काळातील डांबरी रस्ता आजही चांगल्या अवस्थेत आहे. विविध प्रकारचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यावसायिक दुकानांचे जोते येथील वैभवशाली दुकानांची आठवण करून देतात. जि. प. शाळा, आरोग्य केंद्र, पीठगिरणी, पोलीस चौकी, ग्रामदैवत इत्यादीचे आवशेष आहेत. बसथांब्याजवळ दगडी शिळा असून त्यावर महाड २५ किलोमीटर असे लिहिलेले दिसत आहे. नवीन रस्त्यामुळे सध्याचे महाडचे अंतर वाढून ४५ किलोमीटर झाले आहे. स्थानिक नागरिक धरणात जाऊनही आमची शाळा, हा दवाखाना, हे माझे घर असे दाखवून कळत-नकळत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना नवीन गावात जरी पुनर्वसन झाले असले, तरी मातीत रुतलेल्या भावना कडूगोड आठवणी पाण्याखालीच राहिलेल्या आहेत.
पडझड झालेले ग्रामदैवत शंभुमहादेवाचे पूर्वाभिमुखी मंदिर मंदिरातील शिवलिंग आहे. समोरील बाजूला काही शूरवीरांचे पराक्रम सांगणारे बºयाच वीरगळी या ठिकाणी आहेत. येथील पाण्याबाहेर आलेल्या सर्व बाबी आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी सांगत असून वैभवशाली हिर्डोशी आज येथील लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहत असल्याचे इतिहाससंशोधक सुरेश शिंदेयांनी सांगितले.