ओढ्यातील भूयारी मार्ग केल्यास रस्त्यावर उतरू : राष्ट्रवादी कॉग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 07:55 PM2018-08-28T19:55:09+5:302018-08-28T20:00:32+5:30
आमदाराने काडीचेही काम आमच्या भागत केलेले नाही, पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे.
हडपसर : आमदारांच्या चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्गांच्या कामाचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे, भूयारी मार्गला विरोध करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी फारूक इनामदार यांनी दिला. भाजप आमदार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग वरील वाहतूक कोंडी सुटण्याकरिता दोन भुयारी मार्ग ओढ्याच्या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली, यावर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फारूक यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप करून भाजपच्या श्रेयाच्या राजकारणात भुयारी मार्ग रखडल्याचे सांगितले.
ओढ्याच्या ठिकाणी दोन्ही भुयारी मार्गाचे भाजप आमदारांचे नियोजन आहे, पण या ठिकाणी पावसाळ्यातील पाणी जाण्याचे काहीच नियोजन नाही, पर्यायी रस्ते सक्षम उपलब्ध नाहीत. रवी पार्क जवळ डीपी रस्त्यावर घरे आहेत,त्यांचे स्थलांतर नाही, २ कोटी रुपये वाया गेले हा आमदार टिळेकर यांचा दावा चुकीचा असून या पैशात पावसाळी गटारे लाईन टाकून घेतली आहेत. भाजपने जनतेला उड्डाणपुलाचे गाजर दाखवत या भुयारी मार्गास विरोध केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सत्ताधाऱ्यांना ४ वर्षात काही करता आले नाही. आता निवडणुक जवळ आल्याने, लोकांसमोर कसे जायचे या विचाराने आता नागरिकांची दिशाभूल सुरू आहे, पर्यायी रस्ते आम्ही केले, एकेरी रस्ता आम्ही आमच्या जागेतून केला. आमदाराने काडीचेही काम आमच्या भागत केलेले नाही, पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे.
भुयारी मार्गासाठी अशी २ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले होते. जून २०१३ मध्यें ३७ कोटी ९ लाख ७१ हजार रुपयांचा निधी माझ्या व नगरसेविका वैशाली बनकर यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. आम्हाला श्रेय मिळेल म्हणून मेन गेटवरील भुयारी मार्ग रद्द ओढ्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा घाट आमदारांकडून घातला जात आहे.हांडेवाडी रस्त्यावर भुयारी मार्ग करण्याकरिता अवघ्या १६ मिळकती बाधित होत असताना भाजप आमदारांनी १८५ कुटुंब बाधित होईल ही दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती दिली. सरकारी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याऐवजी आमदारांनी हा प्रश्न बिकट करून ठेवला. आता विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने नागरिकांची ही अशी फसवणूक सुरू आहे. रामटेकडीला जाण्याकरिता रस्ता नसताना भुयारी मार्ग करून काही फायदा होणार नाही. मूळ वाहतूक कोंडीचा प्रश्न हा हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण आणि गेटजवळ भुयारी मार्ग करून सुटणार आहे. ही वस्तुस्थिती असताना आमदार मात्र, अभ्यास न करता बिनकामाच्या या विकास योजना राबवत आहेत.यावेळी प्रणयराजे भोसले, बाळासाहेब ससाणे, जब्बार पठाण, सुफियान इनामदार आदी उपस्थित होते.