पुण्यातील उंड्रीत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा; पहिल्या महिला सरपंचांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:21 PM2021-09-10T18:21:25+5:302021-09-10T18:21:39+5:30
दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
वानवडी : वर्षानुवर्षे चालत आलेल्या रुढी परंपरेला फाटा देत उंड्रीतील पहिल्या महिला सरपंच शारदा होले यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हा सर्व प्रसंग पहात असताना उपस्थितीतांचे डोळे पाणवले होते.
उंड्रीतील प्रसिद्ध महिला उद्योजक, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, शारदा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा तसेच उंड्री गावच्या प्रथम महिला सरपंच शारदा मोहन होले यांचे नुकतेच अकाली निधन झाले. मुलगा नसल्यानं मृत्यूनंतर आपल्या मुलींनी आपल्यावर अखेरचे संस्कार करावेत. अशी इच्छा शारदा व मोहन होले यांनी आपल्या मुलींकडे केली होती. त्यानुसार सामाजिक रुढी व परंपरा यांना फाटा देत निकिता शेवते व प्राजक्ता वाकचौरे या मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा व अग्नी दिला. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत असलं तरी अकाली गेलेल्या आईच्या सेवेतील मुलींना बघून हळहळही व्यक्त केली जात होती.
शारदा होले यांनी अनेक महिलांना महिला उद्योग केंद्रातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी उंड्री परिसरात राजकारण न करता एक सामाजिक आणि आपल्या परिवाराप्रामणे नागरिकांची सेवा केली आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने उंड्री चांगल्या व्यक्तीमत्वाला मुकली असल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील राजकीय, सामाजीक क्षेत्रातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शारदा होले यांच्या पश्चात पती, दोन मुली,जावई, दीर, जावा, पुतणे, नातू ,आदी मोठा परिवार आहे.