‘मधुमती’चे उलगडले विश्व - ठमाबाई पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:56 AM2018-10-05T02:56:27+5:302018-10-05T02:56:47+5:30
ठमाबाई पवार : मधुमती पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : कधी ‘मधुमती’ चित्रपट पाहिला नाही ना कधी शाळेची पायरी चढले... कधी समाजकार्य करावं असं स्वप्नातदेखील वाटलं नाही; मात्र आपल्या गावात येऊन लोक समाजाचा विचार करतात... मग आपण का करू नये? स्वत:साठी कुणीही जगतं; दुसऱ्यांसाठी जगायला शिकलं पाहिजे. अहिल्यादेवी पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारताना त्यांनी विचारलं ‘कसं वाटतंय?’ मी म्हटलं ‘१ लाख रुपयांपेक्षा १ लाख महिला कामांसाठी उभ्या राहिल्या तर एक राष्ट्रीय कार्य घडेल....’ अत्यंत आत्मविश्वासाने ठमाताई अनंत पवार ही ग्रामीण पाड्यातील ‘मधुमती’ आपल्या अनुभवाचे अवकाश उलगडत होती.
एकीकडे पडद्यावर साकार होत असलेली ‘मधुमती’ आणि दुसरीकडे वास्तव जीवनातील ‘मधुमती’चे हे सुंदर बोल रसिकांना समृद्ध करून गेले.
निमित्त होते, के अँड यू फाउंडेशनच्या वतीने ‘मधुमती’ या चित्रपटाला ६० वर्षे झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या वेळी ठमाताई अनंत पवार यांना प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची मुलगी रिंकी रॉय भट्टाचार्य व प्रसिद्ध पटकथाकार अंजुम रजबल्ली यांच्या हस्ते ‘मधुमती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ठमातार्इंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगी फौंडेशनचे सत्येंद्र राठी उपस्थित होते.
ठमाताई म्हणाल्या, ‘‘कर्जत तालुक्यातील गरव कामत हे माझं गाव. अंधश्रद्धा, व्यसनं यांनी गावाला ग्रासलेलं होतं. वनवासी कल्याण आश्रमाने गावात वसतिगृह सुरू केलं. तिथं जेवण करायचं काम मिळालं. ही लोक आपल्या समाजासाठी काम करीत आहेत; मग आपण का करू नये? असा विचार आला. मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केले. महिलांशी संपर्क वाढवला व काम उभ राहिले.’’
यावेळी रिंकी रॉय भट्टाचार्य यांच्याशी अंजुम रजबल्ली यांनी संवाद साधत ‘मधुमती’सह दिग्दर्शक बिमल रॉय यांचे पैलू उलगडले. बिमल रॉय मोठे दिग्दर्शक असले तरी ते एक मोठे माणूस आणि माझे गुरू होते. सगळ्यांना ते सहकार्य करायचे. प्रत्येक चित्रपटात जमीनदाराला खालच्या पातळीवरच ठेवले संपत्तीमुळे भेदभाव होतो म्हणून ते भाड्याच्या घरात राहायचे. आम्ही भाड्याच्या घरातच जन्मलो ती त्यांची पॉलिसी होती.. ‘दो भीगा जमीन’ चित्रपटात जे दाखविण्यात आले तेच आज शेतकºयांच्या बाबतीत होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात वर्षात ७०० चित्रपट निर्मित होतात. सगळेच हिट होतील, असे दिग्दर्शकांना वाटते; पण मधुमती सर्वच दृष्टीने सुपरहिट ठरला. प्रत्येक दिग्दर्शकाला एक स्पेस हवी असते. अनेक जण म्हणतात, ‘मधुमती’ हा चित्रपट कलर करावा; मात्र कृष्णधवलची जादू कलर चित्रपटाला येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
दिलीपकुमार यांच्यावरील प्रेमाची कबुली
त्या काळात माझ्यासह सगळेच दिलीपकुमार यांच्या प्रेमात होते. घरात चित्रपटाचे संहितावाचन होते. मी खूप लहान होते, तेव्हा चित्रपटाची टीम निवासस्थानी आली होती.
तेव्हा दिलीपकुमार यांना पाहून एक क्षण हृदय बंद पडल्यासारखे झाले. त्या वेळच्या त्यांचा कारचा नंबर होता ‘२४२४‘. तो आजही लक्षात आहे, अशी आठवण सांगत रिंकी रॉय भट्टाचार्य यांनी दिलीपकुमार यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली.