बेरोजगारांनो सावधान, डमी वेबसाईटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:16+5:302021-07-15T04:10:16+5:30
नोकरीच्या आमिषाने तरुणांच्या फसवणुकीत होतेय वाढ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तुम्हाला दुबईतील कंपनीत चांगली नोकरी मिळेल. त्यासाठी तुम्हाला ...
नोकरीच्या आमिषाने तरुणांच्या फसवणुकीत होतेय वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तुम्हाला दुबईतील कंपनीत चांगली नोकरी मिळेल. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुम्हाला पाठविलेली लिंक ओपन करून फाॅर्म भरा, असे सांगून वेगवेगळी कारणे सांगून त्या तरुणाकडे काही लाख रुपये उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याला बनावट अपाॅईन्मेंट लेटरही पाठविली. त्यावर विश्वास ठेवून हा पैसे भरत गेला आणि शेवटी आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. सध्या बेरोजगार तरुणांना बनावट वेबसाईटद्वारे लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या तरुणांची संख्या वेगाने वाढत आहे.
नोकरीच्या नावाखाली सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारी
२०१९ - ४३०
२०२० - ७५२
२०२१ (जूनपर्यंत) - ५०५
अशी होऊ शकते फसवणूक
अनेक तरुण आपला बायोडाटा वेगवेगळ्या नोकरीच्या वेबसाईटवर पाठवत असतात. या वेबसाईट अनेकदा सुरक्षित नसतात. त्यावरुन सायबर चोरटे हे बायोडाटा चोरतात. तरुणांच्या बायोडाटा पाहून त्यानुसार त्यांना नोकरीची ऑर्फर देतात. अनेकदा बड्या कंपनीच्या नावाने साधर्म दर्शविणारे लेटरहेड तयार करून ते या तरुणांना पाठवितात. अनेकदा संबंधित कंपनीची भरती आमच्यामार्फत केली जात असल्याचे हे सायबर चोरटे सांगतात. त्यावर तरुणांचा विश्वास बसला की अगोदर रजिस्टेशनच्या नावाखाली त्यांच्याकडे मामुली रकमेची मागणी केली जाते. त्यानंतर मेडिकल, मुलाखत परदेशात नोकरी असेल तर व्हिसा, इमिग्रेशन अशी विविध कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या खात्यात पैसे भरायला भाग पाडतात. लाखो रुपये भरल्यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
अशी करा खातरजमा
कोणत्याही सरकारी नोकऱ्र्यांसदर्भात वेबसाईट असेल तर वेबसाईटच्या शेवटी जीओव्ही डॉट इन किंवा डॉट एनआयसी असे असते. आपल्याला ज्या वेबसाईटवरुन ऑर्फर आली आहे. त्याच्या शेवटी हे आहे का, याची तपासणी करावी.
तुम्हाला ज्यांनी नोकरीची ऑर्फर दिली, त्यांच्याकडे तुम्ही खरोखरच आपला बायोडाटा पाठविला होता का याची खात्री करावी.
तसेच, तुम्हाला कोणी एखाद्या कंपनीची लिंक पाठविली असेल तर त्यावरुन संबंधित कंपनीच्या साईटवर जाऊ नये. ती कदाचित बनावट वेबसाईट असू शकते. त्यासाठी थेट कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्याकडे खरोखरच अशी भरती सुरू आहे का, याची अगोदर खात्री करावी. अपेक्षेपेक्षा जास्त प्रलोभने दाखविले जात असल्यास काळजी घ्यायला हवी. प्रसंगी प्रत्यक्ष कंपनीशी संपर्क साधून खात्री करावी.
अधिकृत वेबसाईटची खात्री करावी
एखाद्या नामांकित कंपनीकडून नोकरीची ऑर्फर आल्यावर अगोदर ती वेबसाईट अधिकृत आहे का, याची खात्री करावी. तसेच कोणालाही पैसे पाठविण्यापूर्वी ते संबंधित कंपनीचे अधिकृत खाते आहे का, याची खात्री करावी. नोकरी मिळतेय असे वाटल्याने पैसे पाठविण्यापूर्वी खात्री करुन घेतल्यास आपली फसवणूक होणार नाही.
डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.