पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीमागे बेरोजगारी, जेलमधून सुटलेले गुन्हेगार : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 08:55 PM2020-10-07T20:55:52+5:302020-10-07T21:09:56+5:30
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरात एका पाठोपाठ खुनाचे सत्र सुरु झाले होते.
पुणे : शहरात गेल्या ७ दिवसात ५ खुनाचे गुन्हे घडले असताना ते सर्व २४ तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरात वाढलेल्या गुन्ह्यांमागे लॉकडाऊनमुळे आलेली बेरोजगारी तसेच कारागृहातून पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरात एका पाठोपाठ खुनाचे सत्र सुरु झाले होते. गेल्या ७ दिवसात ५ गुन्ह्यांच्या घटना घडल्या होत्या. ते सर्व गुन्हे उघडकीस आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, बंडगार्डन येथील गुन्हा अधिक गंभीर स्वरुपाचा होता़ जमिनीच्या वादातून हा गुन्हा घडला असून त्यातील मारेकऱ्यासह चौघांना पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे यांचा मोठा वाटा आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखेच्या सर्व युनिटला कार्यरत करण्यात आले होते. अशा घटना होऊ नयेत, यासाठी उपाय योजना केल्या जात आहे. गंभीर गुन्हे घडल्यानंतर त्या केवळ उघडकीस आणण्याबरोबर त्याची सर्व पाळेमुळे शोधून काढण्यावर भर असणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात पॅरोलवर तब्बल २६० गुन्हेगारांना जामीन देण्यात आला आहे़ त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. कारागृहातून सुटलेले गुन्हेगार आणि बेरोजगारी हे शहरातील वाढलेल्या गुन्ह्यांमागील एक प्रमुख कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र त्याचा संपूर्ण डाटा नाही.
महिलांना रात्री सुरक्षित वाटले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करण्यावर आपला प्रयत्न राहणार असून त्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येणार आहे. केवळ आदेश काढणे यावर आपले काम थांबणार नसून त्याची अंमलबजावणी सुरु होऊन परिणाम दिसू लागतील, तेव्हाच त्यांची घोषणा करणे हा आपला स्वभाव आहे. गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत असून गुन्हेगारी संपविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांवर आपला भर असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ़ संजय शिंदे, नामदेव चव्हाण उपस्थित होते.
़़़़़़़़़़
गेल्या आठ दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी तसेच संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी माहिती घेतली. तसेच तपास यंत्रणांना कामाला लावले़ पोलीस आयुक्त आहे, म्हणजे केवळ ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यावर आपला भर असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.