Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:30 PM2024-10-25T19:30:57+5:302024-10-25T19:31:43+5:30
गणेश भोकरे यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातून मनसेचे गणेश भोकरे यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज मनसेकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदार संघातून गणेश भोकरे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता कसब्यातून चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ३० वर्ष भाजपकडे असणारा मतदार संघ स्वतःकडे आणला. त्यामुळे हा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला. आता पुन्हा काँग्रेसकडून धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेकडून गणेश भोकरे निवडणूक लढवणार आहेत. अशातच माजी महापौर कमल व्यवहारे यांनीसुद्धा स्वराज्य पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कसब्याची लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसब्यात धंगेकरांनी मनसेकडून एकदा विधानसभा लढवली होती. त्यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. परंतु धंगेकरांना मताधिक्य मिळाले होते. तेव्हा ते २ नंबरवर होते. यावरून कसब्यात मनसेचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट झाले. आता गणेश भोकरे या मनसेच्या निष्ठावंत आणि तरुण युवकाला पक्षाने संधी दिली आहे. भोकरे हे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते अजून सामाजिक कामात ते सक्रिय असतात. कसब्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही दिसून आले आहे. आता भाजपसमोर अजून एक आव्हान उभे राहिले आहे. भाजप कोणाला कसब्यात संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.