पेटवून दिलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
By admin | Published: February 10, 2015 11:51 PM2015-02-10T23:51:18+5:302015-02-10T23:51:18+5:30
अंजनगाव (ता. बारामती) येथे वडील आणि मुलाला शेतीच्या वादातून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ७) रात्री घडला
बारामती : अंजनगाव (ता. बारामती) येथे वडील आणि मुलाला शेतीच्या वादातून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ७) रात्री घडला. यामध्ये भाजून गंभीररीत्या जखमी झालेल्या रोझम जहांगीर मुलाणी (वय १३) या मुलाचा आज मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी शौकत नसीर मुलाणी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे़ दरम्यान, बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी़ बी़ भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे़ शेतीच्या वादातून सैन्यदलात असलेल्या भावाने सख्ख्या भावाला व पुतण्याला पेटवून दिले होते. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. रोझम हा गंभीररीत्या भाजला होता. उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली. त्याचे वडील जहांगीर मुलाणी यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यातील आरोपी शौकत नसीर मुलाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना शौकत याने घराच्या खिडकीतून पेट्रोल, डिझेल ओतून पेटवून दिले होते. या आगीत घर देखील भस्मसात झाले. त्याचबरोबर ३ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. जमिनीच्या वादात १३ वर्षाच्या रोझमचा नाहक बळी गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शौकत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)