पतीच्या डोळ्यासमोर महिलेचा दुर्दैवी मृत्यू; बिबट्याने ऊसाच्या शेतात नेऊन केली शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:44 PM2023-02-02T12:44:00+5:302023-02-02T12:44:54+5:30
22 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना...
टाकळी हाजी (पुणे) : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि. 1) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यांने जाणाऱ्या पुजा जालिंदर जाधव या 22 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडल्याने शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महिलेवर बिबट्याने हल्ला करीत येथून जवळच्या उसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्या गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने सदर महिला मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घोड कुकडी नदीच्या बेट भागात बिबट्याने मानवावर हल्ला करून ठार मारण्याची ही चौथी घटना असून बिबट्याच्या हल्ल्यात यापूर्वी अनेक नागरीक जखमी झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही महिला ही पुणे जिल्ह्यातील टाकेवाडी, कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय 26) व दिर विश्वास बाळू जाधव (वय 38) असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंके करिता थांबले असता या महिलेचा पती व दिराच्या डोळ्या देखत महिलेवर बिबट्याने हल्ला करीत उसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर दोघांनी आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाच्या शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या शेताच्या बाजुनेच रस्ते जात असून रस्त्याने मजुर शाळकरी मुले ये-जा करीत असतात. यापूर्वी जांबूत येथे तीन घटना घडल्या असून ही चौथी घटना माणसावर हल्ला करण्याची घडली आहे. या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत चालले असून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. घटनास्थळी वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनिल उगले यांनी भेट दिली.