लग्न सोहळा आटोपून घरी जाणाऱ्या महिलेचा पीएमपीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नात गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:21 AM2024-11-26T09:21:02+5:302024-11-26T09:21:38+5:30
सातारा रस्त्यावरील नातुबाग परिसरात ते रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या पीएमपी बसने महिला आणि तिच्या नातीला धडक दिली
पुणे: विवाह समारंभ आटोपून घरी निघालेल्या पादचारी महिलेचा भरधाव पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील नातुबाग परिसरात घडली. या अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली.
आशाबाई दत्तात्रय साळुंके (५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी बसचालक सतीश राजाराम गोरे (३४, रा. कोंढणपूर, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (३८) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
साळुंके कुटुंबीय नातेवाइकांच्या विवाहासाठी शनिवारी (दि. २३) रात्री पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास साळुंके, त्यांची आई आशाबाई, नात प्रचिती हे सोहळा आटोपून घरी निघाले होते. सातारा रस्त्यावरील नातुबाग परिसरात ते रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या पीएमपी बसने आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक फिरोज शेख करत आहेत.