पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू; ५ वर्षांनी मिळाला न्याय, वारशांना ९ लाख
By नम्रता फडणीस | Published: May 4, 2023 03:48 PM2023-05-04T15:48:56+5:302023-05-04T15:49:59+5:30
महिलेला महिना 4 हजार मासिक उत्पन्न मिळत होते, त्यानुसार सरासरी उत्पन्न काढून तिच्या वारशांना मिळाले 9 लाख 75 हजार
पुणे: पोळ्या लाटण्याचे काम करणारी महिला रस्ता क्रॉस करीत असताना भरधाव वेगाने येणा-या ट्रकची धडक बसून तिचा मृत्यू झाला. या महिलेला पाच वर्षांनी न्याय मिळाला. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीमध्ये महिलेच्या वारशांना 9 लाख 75 हजार रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे विमा कंपनीने मान्य केल्याने लोकन्यायालयाच्या पँनेलने दावा निकाली काढला.
कलाबाई भिमशा ख्याले असे अपघाती मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 27 आॅगस्ट 2018 रोजी घडली होती. ख्याले यांच्या वारशांनी अँड.शशिकांत एम.बागमार, अँड निनाद एस.बागमार व अँड अमित नलावडे यांच्या मार्फत मोटार अँक्सीडेंट क्लेम ट्रिब्युनल यांच्याकडे ट्रकचालक व ट्रकचा विमा असलेल्या जनरल इन्शुरन्स कंपनीविरूद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. या दाव्यामध्ये हडपसर पोलिसांनी डायरेक्ट अँक्सीडेंट रिपोर्ट अंतर्गत सर्व कागदपत्रे नुकसान भरपाई मिळण्याकामी कोर्टात दाखल केले होते. ख्याले यांच्या वारशांनी कोर्टात हजर राहून नुकसान भरपाईचा दावा केला. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत जिल्हा न्यायाधीश एस.आर.नावंदर व अँड वाघचौरे यांच्या पँनेलसमोर हे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले. यावेळी विमा कंपनीने ख्याले यांच्या वारशांनी 9 लाख 75 हजार रुपये देण्याचे मान्य केले. या दाव्यामध्ये अँड शशिकला वागदेरकर यांनी इंन्शुरन्स कंपनीच्या वतीने काम पाहिले.
''पोळ्या लाटणा-या महिलेच्या उत्पन्नाचे मूल्यांकन कसे करायचे? यावर चर्चा झाली. ती महिला घरोघरी जाऊन पोळ्या लाटण्याचे काम करीत होती. तिला महिना 4 हजार मासिक उत्पन्न मिळत होते याकडे आम्ही लक्ष वेधले. त्यानुसार सरासरी उत्पन्न काढून तिच्या वारशांना 9 लाख 75 हजार रुपये रक्कम देण्याचे विमा कंपनीने मान्य केले- अँड निनाद.एस.बागमार, महिला पक्षकाराचे वकील''