डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:56 IST2024-02-10T15:56:09+5:302024-02-10T15:56:34+5:30
संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत

डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना
आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीत पद्मावती रस्त्यावर डंपर व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये डंपरचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि.१०) सकाळी ही घटना घडली. प्रीती योगेश धुमाळ (वय ३२) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती धुमाळ पद्मावती रस्त्याने आपल्या मुलासह दुचाकीने प्रवास करत होत्या. मात्र ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ अपघातात डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेला चिमुकला बचावला. संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्यापाठीमागे पती व दोन लहान मुले आहेत.
दरम्यान आळंदी शहरात सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असतानाही जड वाहने बिनधास्तपणे ये - जा करत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात अवडज वाहनांखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आळंदी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.