विजेच्या शॉकमुळे सहा फ्लेमिंगोंचा दुर्देवी मृत्यू; मावळ तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:49 PM2021-02-11T17:49:48+5:302021-02-11T18:10:07+5:30
सहा फ्लेमिंगोंचा विजेच्या शॉकमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त..
पुणे (तळेगाव दाभाडे) : मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे या गावात उच्च दाब वाहिनीला (high tension) धडकून ६ फ्लेमिंगोंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.गुरुवारी( दि. ११) पहाटे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला बर्ड फ्ल्यूमुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. त्याच पार्श्वभूमीवर फ्लेमिंगोंचे शवविच्छेदन करण्यात आले. यात उच्च दाब वाहिनीच्या शॉकमुळे ही घडल्याचे स्पष्ट झाले.
नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात गुरुवारी (दि.११)सकाळी सहा फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत आढळून आले. उच्च विद्युत वाहिनीच्या तारेचा धक्का बसून या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व पक्षी मादी जातीचे आहे .रमेश बबन दहातोंडे यांना बधलवाडी येथील गबाजी नाथा दहातोंडे यांच्या शेतात हे पक्षी मृतावस्थेत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश संपतराव गराडे यांच्याशी संपर्क साधाला, गराडे यांनी वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने घटनास्थळी वनपरीमंडळ अधिकारी डी. एम. ढेंबरे, वनरक्षक रेखा वाघमारे, वनसेवक कोंडीबा जांभूळकर,वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, निलेश खंडागळे, प्रथमेश मुंगणे कर, निनाद काकडे, विकी दौंडकर , कैलास मोहिते, गणेश ढोरे, गणेश निसाळ, तुषार सुतार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
काही पक्ष्यांचे पंख, काहींचे पाय तर काहीची मान तुटली होती. पक्ष्यांना शॉक बसल्याने मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांचा काही भाग जळाला होता. फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरीत होत असताना अधिक संख्येने असतात. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांचा उच्च दाबाच्या दोन ता रांमध्ये संपर्क आला असावा. त्यामुळे हे सहाही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत, अशी महिती गराडे यांनी दिली. घटनास्थळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शितलकुमार मुकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे, मावळचे पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे , डॉ. नितीन मगर यांनी घटनस्थळाला भेट दिली. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर त्यांचे वडगाव मावळ येथील वन हद्दीत वन अधिकारी यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावण्यात आली.
फ्लेमिंगो या पक्ष्याला रोहित पक्षी म्हणुन देखील ओळखले जाते. पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला हा पक्षी आहे. त्याची मान उंच व पाय लांब असतात. रोहिताची पिसे आणि चोच गुलाबी आणि काळ्या रंगाची असतात. फ्लेमिंगो पक्षी हे छोटे कवचधारी प्राणी, अळ्या, कीटकांचे पिलव, पाणवनस्पतींच्या बिया, सेंद्रिय गाळ, शैवाल खाऊन आपला उदरनिर्वाह करतात, असे गराडे यांनी सांगितले.
.