आगीत जखमी दोघाही भावांचा दुर्दैवी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:11 AM2017-11-20T00:11:02+5:302017-11-20T00:11:09+5:30
कोरेगाव भीमा : येथील मुख्य चौकात असलेल्या आगरवाल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी (दि. ८) लागलेली आग विझवताना सतीश व संतोष आगरवाल दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते.
कोरेगाव भीमा : येथील मुख्य चौकात असलेल्या आगरवाल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी (दि. ८) लागलेली आग विझवताना सतीश व संतोष आगरवाल दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते. आठ दिवसांपूर्वी सतीश आगरवाल यांचे निधन झाले होते. शनिवारी (दि. १८) सायंकाळी संतोष लखीराम आगरवाल यांचेही निधन झाले. दोघा सख्ख्या भावांचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याने परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
आग लागल्याचे समजताच आगरवाल बंधूंनी दुकानाकडे धाव घेतली असता दुकानाचे शटर उघडताच आग शटरमधून बाहेर आल्याने आगीच्या लोळात भाजून दोघे जखमी झाले होते. दोघांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आले होते. त्यातील सतीश आगरवाल यांचे गेल्या शनिवारी (दि. ११) निधन झाले होते. त्यानंतर आठच दिवसांत संतोष यांचे निधन झाले.
दोघांच्या निधनामुळे कोरेगाव भीमा येथील व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. आज दुपारी भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर भीमा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सतीश व संतोष आगरवाल सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून केसनंद येथील जोगेश्वरीच्या डोंगरावर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. तसेच गावातील पाणपोई, माणुसकीची भिंत उपक्रम तसेच फिल्टर पाणपोई सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. संतोष आगरवाल यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.