दुर्दैवी घटना! पावसापासून बचावासाठी त्याने बॅनर अंगावर घेतला अन् जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:25 PM2024-07-02T13:25:13+5:302024-07-02T13:25:38+5:30
पिंपरी : पावसापासून बचाव व्हावा यासाठी मजूर अंगावर बॅनर घेऊन झोपला. मात्र अज्ञात वाहन चालकाला तो बॅनरखाली दिसला नाही. ...
पिंपरी : पावसापासून बचाव व्हावा यासाठी मजूर अंगावर बॅनर घेऊन झोपला. मात्र अज्ञात वाहन चालकाला तो बॅनरखाली दिसला नाही. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
कपिल विलास अंकुरे (२१, रा. बोरी, परभणी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बसथांब्याजवळील मोकळ्या मैदानात एकाचा खून झाला असल्याची माहिती अशोक नावाच्या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना एका बॅनरखाली कपिलचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुना नव्हत्या. मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे मोलमजुरी करणारे अनेकजण मोकळ्या मैदानाचा आसरा घेताना पावसापासून बचाव करण्यासाठी अंगावर बॅनर, प्लॅस्टिक घेतात. अशाच प्रकारे कपिल याने अंगावर बॅनर घेतला होता. मात्र अज्ञात वाहनचालकाला बॅनरखाली झोपलेली व्यक्ती दिसली नाही आणि त्या वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.