तब्बल १२ तासाच्या शोधानंतर मृतदेह सापडला... पुण्यातील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:20 PM2018-05-14T21:20:20+5:302018-05-14T21:20:20+5:30
वारजे ते कात्रज...अवघे काही मिनिटांचे अंतर...पुणेकर तर वारज्याच्या पुलावरून अगदी सवयीने रोज कात्रजला ये-जा करतात. पण प्रत्येकाच्या नशिबात असा अनुभव असतोच असे नाही.
पुणे :वारजे ते कात्रज...अवघे काही मिनिटांचे अंतर...पुणेकर तर वारज्याच्या पुलावरून अगदी सवयीने रोज कात्रजला ये-जा करतात. पण प्रत्येकाच्या नशिबात असा अनुभव असतोच असे नाही. पुण्यातील किरण हुले यांचा रविवारी याच वारज्यातील पुलावर अपघात झाला आणि ते थेट नाल्यात पडले. रात्री काही तास शोधकार्य केल्यावर सोमवारी दिवसभर पोलिसांसोबत अग्निशमन दलाने शोध घेऊन तब्बल १२ तासाच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सापडला.
किरण अभय हुले या ४० वर्षीय व्यक्तीचा कर्वेनगरहून वारजे पुलामार्गे कात्रजला जाताना हा अपघात झाला. त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाचा धक्का लागला असावा. या धक्क्याने हुले गाडीवरून पडून दोन पुलांच्या दरम्यान असलेल्या सांध्यातून थेट खालच्या नाल्यात पडले. रात्री ११ची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. मात्र शेजारून वावरणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना बघितली आणि पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून रामनगर पोलीस चौकी पोलिसांनी धाव घेत शोध घेण्यास सुरुवात केली. अंधार आणि नाल्यातील दलदल बघून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यांनी सुमारे चार तास शोध घेऊन अंधारामुळे शोधकार्य थांबवले. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आणि अखेर संध्याकाळी हुले यांचा मृतदेह हाती लागला. दरम्यान त्यांच्या गाडीच्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी त्यांच्या घरी संपर्क साधला. अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढलेला मृतदेह हुले कुटुंबीयांनी ओळखला असून रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करणे सुरु आहे.