आई-वडिलांचे कोरोनामुळे एकाच दिवशी निधन, बारामतीच्या माजी नगराध्यक्षाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:44 PM2021-04-26T13:44:14+5:302021-04-26T14:21:09+5:30
बारामतीतील माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांचे आई - वडील
बारामती : कोरोना महासाथीमुळे घरेच्या घरे उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. एकाच कुटूंबातील अनेक व्यक्तींचा घास कोरोना महामारीने घेतला आहे. बारामतीच्या माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांच्यावर देखील असाच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बोबडे यांचे आई-वडील एकाच दिवशी कोरोनाने हिरावून नेले आहेत.
रविवारी (दि. २५) संध्या बोबडे यांचे व़डील शांताराम शिंदे (वय ८९ ) व आई पुष्पावती शिंदे (वय ८०) यांचे अगदी काही तासांच्या अंतराने निधन झाले.
दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातून थोड अंग दुखतय म्हणून विश्रांती साठी संध्या बोबडे यांच्याकडे ते आले होते. दवाखान्यात नेल्यानंतर दोघांच्याही तपासण्या करुन घेण्याचे डॉ. सतीश बोबडे यांनी ठरविले. ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु झाले.
बारामतीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही काळ त्यांनी उपचाराला साथही दिली. परंतू रविवारी मात्र प्रारंभी शांताराम शिंदे यांची प्रकृती खालावली व त्यांची प्राणज्योत मालविली. काही तासातच पुष्पावती यांनीही आपला प्राण सोडला. मात्र, पतीचे निधन झाल्याचे पुष्पावती यांना कोणीही सांगितलेले नव्हते, त्यांची तब्येत थोडी चिंताजनक असल्याचेच त्यांना सांगितले गेले. मात्र आयुष्यभर साथ सोबत केलेल्या पुष्पावतीही आपल्या पतीसोबतच कायमच्या निघून गेल्या. शांताराम शिंदे मातीपरिक्षण अधिकारी होते, नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केलेले होते. बारामतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा संध्या बोबडे या त्यांच्या कन्या. एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला.