दुर्दैवी! चाऱ्याअभावी भुकेने तडफडत 'भोलेनाथा'ने घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 11:38 AM2021-04-09T11:38:44+5:302021-04-09T11:57:54+5:30
लॉकडाऊनमुळे नंदीवाल्यांना बसतोय फटका
पिंपरी: नंदीबैल घेऊन गावोगावी फिरून मोडकेतोडके भविष्य सांगून भोळ्याभाबड्या लहान थोरांची करमणूक करण्याचे काम करत असतो. नागरिकांकडून या नंदीच्या पोटापाण्याची सोय होते. परंतु लॉकडाऊनमुळे अनेक नंदीवाल्याना फटका बसला आहे. "आम्ही आमचे पोट भरू पण मुक्या जनावरांसाठी चारा कुठून आणणार" अशी भावना नंदीवाल्यानी व्यक्त केली आहे. अशाच परिस्थितीत एका नंदीने चारापाणी न मिळाल्याने भुकेअभावी जगाचा निरोप घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
वाल्हेकरवाडी येथे पवना नदीच्या घाट परिसरात नंदीवाल्यांचे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नंदीबैल तसेच इतर जनावरेही आहेत. सहा नंदी असून एका कुटुंबातील एक सदस्य, असे पाच ते सहा सदस्य मिळून एक नंदी घेऊन शहर परिसरात फिरून उदरनिर्वाह चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिरण्यावर निर्बंध आले. त्यांच्याकडे उपलब्ध होता तेवढा चारा त्यांनी नंदीबैल तसेच इतर जनावरांना दिला. मात्र दोन-चार दिवसांतच चारा संपला. हातात पैसा नसल्याने तसेच बाहेर पडता येत नसल्याने चारा खरेदी करण्यास किंवा उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. घाट परिसरात नदीकिनारी जनावरांना चरायला सोडले. मात्र तेथेही गवत किंवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची उपासमार होऊ लागली. त्यातच सहा वर्षे वयाचा नंदी चाऱ्याअभावी भुकेने व्याकुळ झाला. नंदीवाल्यांनी त्याचा जीव वाचावा म्हणून अतोनात प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. चारा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी भुकेने तडफडत त्या नंदीने जगाचा निरोप घेतला.
सांग सांग भोलानाथ लॉकडाऊन खुलेल काय?
भगवान महादेवाचे वरदान लाभलेला बैल म्हणून नंदीला विशेष महत्त्व असते. नंदीवाले मोडके तोडके भविष्य सांगतात. त्यावर हा नंदी दोन-तीन वेळा मान हलवून शिक्कामोर्तब करतो. सुगीच्या दिवसांमध्ये हे नंदीवाले ग्रामीण भागात फिरून धान्य तसेच पैसे जमा करून आणतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे बालगीत देखील या नंदीवर आधारित आहे. मात्र कोरोना महामारीमुळे नंदीचे हाल आहेत. सांग सांग भोलानाथ लॉकडाऊन खुलेल काय, असा प्रश्न पडतो आहे.
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये एका नंदीसह चार जनावरे दगावली. आज आणखी एक नंदी दगावला. आमचे पोट आम्ही कसेबसे भरू. मात्र या मुक्या जनावरांचे काय, त्यांच्यासाठी चारा कोठून आणणार, त्यांचा जीव कसा वाचवायचा असं प्रश्न आम्हाला पडतो आहे.
- सदाशिव गंगावणे, नंदीवाले, वाल्हेकरवाडी