आर्मीच्या वेशातील अज्ञात व्यक्तीकडून वानवडीत धुमाकूळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:04 PM2019-08-27T15:04:40+5:302019-08-27T15:05:35+5:30

ही अज्ञात व्यक्ती रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गावातील कोणाच्याही घरात घुसत आहे.

An unidentified man in an army uniform in wanavdi | आर्मीच्या वेशातील अज्ञात व्यक्तीकडून वानवडीत धुमाकूळ...

आर्मीच्या वेशातील अज्ञात व्यक्तीकडून वानवडीत धुमाकूळ...

Next
ठळक मुद्देवानवडीत भितीचे वातावरण , रात्री येईना झोप.. 

पुणे : वानवडी परिसरात आर्मी वेशभूषा असलेली एक अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरात घुसत असल्याने वानवडी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
याबाबत गावातील नागरिक दिनेश सामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मीचे कपडे घातलेला ६ ते ६.५ फुट उंच व्यक्ती सोमवारी रात्री भोसले वाडा येथे दिसला होता. दोन दिवसापूर्वी असाच प्रकार आबनावे वाडा येथे घडला होता व पंधरा दिवसापूर्वी भैरोबा मार्ग ४ नंबर बंगला येथे एका घरात हीच आर्मी वेशातील व्यक्ती घुसली.
ही अज्ञात व्यक्ती रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गावातील कोणाच्याही घरात घुसत आहे. तो भिंतीवरुन उड्या मारत मध्येच कोठेतरी गायब होत आहे. घरात घुसुन स्रियांच्या, मुलींच्या बाजूला झोपत असल्याने वानवडीत भितीचे वातावरण झाले असून नागरिकांना रात्रीची झोप लागत नाही. 
कोणतीही चोरीची किंवा विनयभंगाची, मारहाणीची घटना या व्यक्तीकडुन झाली नसली तरी ही व्यक्ती चोर आहे असा गावकऱ्यांचा समज आहे तसेच पुढे काही विपरीत परिणाम घडण्याच्या अगोदर या व्यक्तीला पकडणे गरजेचे आहे. 
गावकरी व दिनेश सामल यांनी वानवडी बाजार पोलिसांना सांगितले असता वानवडी पोलिसांकडून सोमवारी रात्री या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली परंतु ही व्यक्ती कोठेही सापडली नसल्याने पोलिसांकडून तपास कार्य सुरु आहे तसेच कोणालाही ही आर्मी वेषातील ६ फुट उंच व्यक्ती आढळल्यास वानवडी पोलिसांना कळवावे व शक्य असल्यास पोलीस येईपर्यंत त्या व्यक्तीला पकडण्याचे आवाहन वानवडी पोलीसांनी केले आहे.

अज्ञात व्यक्ती येडसर असल्याचा संशय.. 
वानवडी भागात पूर्वी दोन वेडसर व्यक्ती होत्या. ते सुद्धा आर्मी कपडे परिधान करत असत त्या व्यक्तींना पोलिसांनी समज दिली होती. कालांतराने हे दोन व्यक्ती बेपत्ता होते. त्यातील एक वेडसर व्यक्ती असाच उंच होता त्यामुळे त्या दोन व्यक्ती मधील ही अज्ञात व्यक्ती असल्याचा संशय वानवडी बाजार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक आत्माराम शेटे यांनी व्यक्त केला आहे. अज्ञात व्यक्तीचा तपास सुरु असल्याचे वानवडी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले. 

Web Title: An unidentified man in an army uniform in wanavdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.