अज्ञातांकडून सेल्फी पॉइंटची तोडफोड, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 03:25 PM2020-12-24T15:25:32+5:302020-12-24T15:26:37+5:30
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हेगावात घडला प्रकार; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
धायरी: सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असल्याचे समजते.
नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने केलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चार तरुणांपैकी एकाने ह्या फलकाची तोडफोड केली असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समविष्ट करण्याचा अध्यादेश बुधवारी राज्य सरकारने काढला. त्यात नऱ्हे गावाचाही समावेश आहे. राजकीय वर्चस्वाच्या तसेच राजकीय वैमस्यातून ही तोडफोड झाल्याचे समजते आहे.
काही समाजकंटकांनी 'आय लव्ह नऱ्हे ' या फलकाची तोडफोड केली आहे. फलकाची तोडफोड करून माझ्या मनात असणारे नऱ्हे गावाबद्दलचे प्रेम ते तोडू शकत नाहीत. यापुढेही नऱ्हे गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.
सागर भूमकर, उपसरपंच, नऱ्हे.