#AnokhaBappa: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अखंडित परंपरा : वसा, वारसा निसर्गपूजनाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:24 PM2018-09-10T21:24:24+5:302018-09-10T21:28:38+5:30
पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत.
पुणे : समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञानदृष्ट्या समाजाला साक्षर करण्याकरिता या उत्सवाची भूमिका महत्त्वाची ठरू लागली. यातच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत.
त्वष्टा कासार समाज संस्थेच्या श्रींची मूर्ती ही शमीच्या लाकडापासून बनवली गेलेली एक ऐतिहासिक मूर्ती म्हणून ओळखली जाते. यंदा हे मंडळ १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. संस्थेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयीची माहिती देताना मंडळाचे अंजलेश वडके यांनी सांगितले, की साधारण १९०४ मध्ये शमीच्या वृक्षाच्या लाकडापासून मूर्ती तयार करण्यात आली. गुजरातमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली. वास्तविक गणपतीला प्रिय असणारा शमी वृक्ष हे एक धार्मिक कारण असून शमीच्या सालीचा उपयोग दमा, श्वेतकुष्ठ, कुष्ठरोग या रोगांवर होतो. उत्सवाबरोबरच त्यातून वैज्ञानिक व आरोग्यपूर्ण संदेश जात असल्याने लाकडाची गणेशमूर्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली असून तिचे जतन करण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती मूर्ती फायबरची आहे. नागरिकांनी निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी शोभायात्रा व श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून संदेश दिला जातो.
१८९६ मध्ये श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. मारुती खेडकर यांनी पिंपळाच्या वृक्षापासून श्रींची मूर्ती बनवली. पुढे २००२ मध्ये एका अपघातात या मूर्तीचे नुकसान झाले. तिचे दाभोळच्या खाडीत विसर्जन केले. पुढे कार्यकर्त्यांनी आपल्याला लाकडाचीच मूर्ती हवी, असा आग्रह धरला. यानंतर इचलकरंजी येथून बर्माटिक लाकडापासून व राजस्थान येथील कारागिराकडून तयार करून घेण्यात आली. सामाजिक विषयांबरोबरच पर्यावरणपूरक विषयांना केंद्रस्थानी ठेवून समाजाचे प्रबोधन करण्यावर मुख्य भर असल्याचे श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख दत्ताभाऊ परदेशी यांनी सांगितले. मागील वर्षी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा देखावा मंडळाने सादर केला होता. यावर्षी ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ या विषयावर हलते देखावे सादर करण्यात येणार आहेत.
* ‘ना गुलाल ना डीजे’
पारंपरिक वाद्ये जाऊन त्याची जागा डीजेने घेतली. मात्र यामुळे वाद्यानंद हरपून त्याची जागा गोंगाटाने घेतली. गेल्या काही वर्षांपासून शहरात डीजेची क्रेझ वाढत असून ढोल, झांज, लेझीम यांचा आनंद घेण्यास कुणी मागत नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना कमीत कमी प्लॅस्टिक, थर्माेकोलचा वापर, शताब्दी वर्षापासून नो गुलाल आणि नो डॉल्बी असा निर्णय त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.