“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:18 PM2021-08-24T19:18:20+5:302021-08-24T19:18:39+5:30

राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच, पण संपूर्ण देश राणेंच्या पाठीशी असणार

"Union government arrests Union Minister Narayan Rane out of revenge", criticizes Chandrakant Patil | “राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

Next
ठळक मुद्देकॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपा-शिवसेनेची मैत्री तोडण्याचे काम केले

पुणे : “राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे,” असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांना अटक ही दंडेलशाहीची देशातली पहिलीच घटना असून, राष्ट्रीय नेते अमित शहा यांनीही राणे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. 

“राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने सरकारने त्यांना अटक केली. याची कायदेशीर लढाई भाजपा पूर्ण ताकदीने लढेल. राणे यांच्या शैलीमुळे भाजपाची कोणतीही फरपट होत नसून ते पक्षाचे ‘ॲॅसेट’ आहेत,” असे पाटील म्हणाले. “कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपा-शिवसेनेची मैत्री तोडण्याचे काम केले. आता आमच्यात वैर निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत,” असे सांगून ते म्हणाले की, राज्यातले भाजपा खासदार लोकसभा अध्यक्षांकडे हक्कांवर गदा येत असल्याप्रकरणी तक्रार करणार आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, राणे यांची बोलण्याची एक शैली आहे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रघात आहे. विरोधक त्यांना उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय मंत्र्यांना थेट अटक म्हणजे राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारला सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाण्याची सवय आहे. राणेंच्या अटकप्रकरणी हेच होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले हे चालते का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्यपाल राज्याचे संविधानिक प्रमुख असतात. त्यांना उद्देशून ‘म्हातारा’, ‘वय झाले’, ‘विसरतो’ असे एकेरी उल्लेख करता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काठ्या-लाठ्या, तोडू-फोडू अशा किती हिंसक शब्दांचा वापर होतो, बडवलं पाहिजे असं म्हणता. ते चालतं का? असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील याचा विचार करावा. “विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पदानुसार पक्षविरहित भूमिका आवश्यक आहे. पण सातत्याने त्या पक्षीय भूमिकेतून बोलत आहेत. त्यांची विधाने आणि लेखांच्या आधारे लवकरच त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल,” असेही पाटील म्हणाले.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची

“भाजपाच्या नाशिक येथील कार्यालयावरील हल्ला भ्याड आहे. शब्दांची लढाई शब्दांनीच करावी. असे लांबून दगड मारणे भ्याडपणा आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. शिवसेना कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

समज देऊन मिटले असते

“नारायण राणे यांच्या आक्रमकतेमुळे भाजपाची प्रतिमा बिघडत नाही. ते काहीही चुकीचे करत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राणेंचा स्वभाव अन्याय सहन न करण्याचा ‘जशास तसे’, ‘ठोशास ठोसा’ असा आहे. भाजपाचीही शैली ‘आक्रमक पण नम्र, आपल्या मुद्याशी ठाम’ ही आहे. राणेंच्या वक्तव्यानंतर सरकारला त्यांना समज देऊन हे प्रकरण मिटवता आले असते,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: "Union government arrests Union Minister Narayan Rane out of revenge", criticizes Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.