...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 10:12 PM2021-02-24T22:12:04+5:302021-02-24T23:16:00+5:30
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
प्राची कुलकर्णी
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. होम आयसोलेशन हेच रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातल्या रुग्णवाढी संदर्भात काळजी व्यक्त करतानाच त्यांनी ॲण्टीजेन चाचण्या केल्या जाऊ नयेत असेही ते म्हणाले.
पुण्यातील पुणे फोरम फोर कोविड रिस्पॉन्स यांच्यावतीने काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. पुणे शहरातल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी यात करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या समवेत आज फोरमच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये फोरमचे प्रमुख सुधीर मेहता, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर दिलीप कदम उपस्थित होते.
यावेळी राजेश भूषण यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित केले. भूषण यांच्या मते पुणे जिल्ह्यामध्ये आरटीपीसी या चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांचे स्क्रीनींग केले जात नाही ही वाढत्या रुग्ण संख्येचे महत्वाचे कारण असल्याचे देखील ते म्हणाले. नागरिकांकडून कोरोना नियम पाळण्यातला निष्काळजपणा हे देखील काळजीचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आता लसीकरण नागरिकांसाठी खुले करण्यात आले असले तरी यात पुणेकरांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी यानिमित्ताने सुधीर मेहता यांनी केली.