पुण्यातील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:50 PM2022-11-15T18:50:23+5:302022-11-15T18:51:00+5:30
रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आंबेगाव येथे होणार आहे.
पुणे : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या पुणे शिवसृष्टीच्या प्रथम चरणाच्या लोकार्पण सोहळ्याला अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आंबेगाव येथे होणार आहे.
पुणे हे राज्याचे सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक व आयटी केंद्र आहे. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यक्ती येतात. पुण्यात येणार्या व्यक्तीला शनिवारवाडा, केळकर वस्तुसंग्रहालय, सिंहगड इत्यादी पर्यटन केंद्रे उपलब्ध आहेत. त्यात आता शिवसृष्टीची भर पडणारा आहे. या प्रकल्पातून शिवचरित्र साकारताना ते जागतिक कीर्तीचे असणार आहे. महाराजांच्या जीवनातील असंख्य प्रसंग आहेत. ज्यातून कायम प्रेरणा मिळत राहते. असे अनेक प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकार केले जाणार आहेत. शिवाजी महाराजांची रायगडावरील राजसभेची प्रतिकृती (65 हजार चौरस फूट) येथ साकारण्यात येणार आहे. प्रतापगडावरील भवानी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून तेथेच महाराष्ट्रातील प्रमुख देवतांच्या मंदिराच्या प्रतिकृती असणार आहेत. तसेच शिवसृष्टीमध्ये एक रंगमंच निर्माण करण्यात येणार असून त्यात महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (व्हर्च्युअल रियालिटी) साकार होणार आहेत - उदा., आग्य्राहून सुटका, पावनखिंडीतील लढाई, महाराजांचे आरमार इत्यादी गोष्टींबरोबरच राजमाचीवरील तोफेचा अनुभव शिवभक्तांना घेता येणार आहे. महाराजांची दूरदृष्टी आणि नीती यांचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग, घटना शिवसृष्टीमध्ये समाविष्ट असणार आहेत.