साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
By नितीन चौधरी | Published: January 12, 2024 07:37 PM2024-01-12T19:37:23+5:302024-01-12T19:37:31+5:30
या जागतिक परिषदेला २७ देशांमधील २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.
पुणे: ग्रीन हायड्रोजन सारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झानुझुनवाला, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, एका बाजूला कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषी उत्पादने मागणीपेक्षा जास्त आहेत त्यामुळे त्यांना पुरेसा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना त्यासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे लागते आणि दुसऱ्या बाजूला आपण सुमारे ८० टक्के पारंपरिक इंधन आयात करतो. आपल्या देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझीलसारख्या देशावर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे. केवळ साखर उद्योगच नव्हे तर देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन सारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
हायड्रोजन सारख्या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र अभियान हाती घेतले असून साखर उद्योगाने त्याचा देखील फायदा घेण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. जागतिक हवामान बदलाचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केले. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
गडकरी व पवार यांनी प्रदर्शनातील अनेक स्टॉलना भेटी देऊन पाहणी केली. जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी या विषयावरील या जागतिक परिषदेला २७ देशांमधील २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.