मी चंद्रकांत दादांना सांगितलं; इथला प्रत्येक माणूस आपल्याला शिव्या देतोय; गडकरींनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:24 PM2021-09-24T16:24:38+5:302021-09-25T15:52:35+5:30
सर्वांनी प्रदुषण कसं कमी करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुण्यात उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी मांडले.
पुणे: पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवले तर शहरातील वाहतूककोंडी कमी होईल. तसेच पुण्यातील हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यक्रम आखला पाहिजे. भारतातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये पुणे अग्रेसर आहे. यामुळे सर्वांनी प्रदुषण कसं कमी करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुण्यात उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी मांडले.
प्रदुषण कमी करण्यासाठी पोलीस आणि अँब्यूलन्स सोडून मी सर्वांचे लाल दिवे काढून टाकले. सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन बंद केले आहेत. मंत्र्यांसाठी सायरन आणि सलामी हा मोठा आकर्षणाचा विषय आहे, असा टोलाही गडकरींनी लगावला. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. २४) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून २२१५ कोटी किमतीचा २२१ किमी लांबीचा असे २२ महामार्ग बांधले जाणार आहेत. यापैकी काही पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तथा उर्वरित कामांचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या हस्ते झाले. pic.twitter.com/FU20usyy6w
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 24, 2021
भुसंपादन करून दिलं तर पुण्यात रिंग रोड बांधून देईन, ही मोठी घोषणाही याप्रसंगी गडकरींनी केली. पुणे-बंगळुरू ४० हजार कोटींचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच पुणे-बंगळुरू नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आणि मेट्रोने जोडता येईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
दरम्यान, नितीन गडकरी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी सकाळी घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. आज सकाळी मी रस्त्याने येताना मला फार वाईट वाटलं. सगळे रस्ते बंद केले होते. चंद्रकांत दादांना मी म्हटलं की आपल्याला बरं वाटतंय कारण ट्रॅफिक नाही. पण इथला प्रत्येक माणूस आपल्याला माय-बहिणीच्या शिव्या देतोय की यांनी रस्ता बंद केला. पण झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या काही प्रोटोकॉल पद्धती असतात, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.
पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय-
गडकरी म्हणाले की, माझ्या आयुष्यात पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय. मी राजीव बजाज यांना सांगितल की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका. त्यांनी तशी गाडी तयार केली. मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असं गडकरी म्हणाले.