"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:34 AM2024-07-26T09:34:20+5:302024-07-26T09:44:00+5:30

पुण्यातल्या पुराचे खापर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याच्या जलसंपदा खात्यावर फोडलं आहे.

Union Minister of State Muralidhar Mohol has blamed the water resources department for the flood in Pune | "पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर

"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर

Pune Flood : पुण्याला गुरुवारी महापुराचा प्रचंड फटका बसला. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडल्याने पुण्याच्या सखल भागात जलप्रलय आला. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. दुसरीकडे, लोकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून बुधवारी रात्रीच्या ऐवजी पहाटे पाणी सोडल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. मात्र आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनावर पुराचे खापर फोडलं आहे. मोहोळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटलं आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही धरणे १०० टक्के भरली होती. त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. अधिकाऱ्यांनी पहाटे ३५ हजार क्युसेक पाणी येत असल्याची माहिती दिली होती. यामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराची मदत घेण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेतल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता, असं म्हणत याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

"धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. खऱ्या अर्थाने जलसंपदा खात्याचे प्रशासन आणि महापालिकेच्या प्रशासनात समन्वयाच्या अभाव दिसून आला. तुम्ही ५५ हजार क्युसेक पाणी सोडणार होतात तर त्याची माहिती देणे अपेक्षित होतं. लोकांना यासंदर्भात सावध करणे आवश्यक होते. हे सगळं कुठल्याही प्रकार खपवून घेतलं जाणार नाही. याची निश्चितपणे चौकशी करु. मला सकाळी ५५ हजार क्युसेक पाणी सोडल्याची माहिती मिळाली होती. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता. त्यामुळे आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही. याची चौकशी होणार आहे," असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.

दरम्यान, बुधवारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४०००० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालं आहे.

Web Title: Union Minister of State Muralidhar Mohol has blamed the water resources department for the flood in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.