'बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे'; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:45 AM2022-09-13T11:45:10+5:302022-09-13T11:58:06+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपच्या विरोधात पुणे महापालिकेसमोर आंदोलन
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी तळी साठल्यासारखी परिस्थिती झाली आहे. सध्या पुणे मनपात प्रशासकराज सुरू आहे. त्यापूर्वी भाजपचा महापौर पालिकेवर होता. शहरात पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साठलंय. भाजप सत्तेत असताना त्यांनी पुणेकरांची दुर्दशा केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज करण्यात आला. भाजपच्या कारभाराचा निषेध करत पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर राष्ट्रवादीकडून बोट आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर बोट आणून त्यात बसून घोषणा दिल्या. सध्या शहरात अनेकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी गेलं आहे. ड्रेनेज लाईन तुटलेल्या होत्या. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप झाले होते. एकंदरीत पुणेकरांची कालच्या पावसाने दाणादाण उडविली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहर स्मार्ट करण्याची घोषणा केली होती. परंतु पुण्यातील भाजपाच्या कारभाऱ्यांनी मात्र पुणे आणि पुणेकरांची दुर्दशा केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून यावेळी करण्यात आला.
गेली पाच वर्षे मनपातील कारभार तर देशाच्या पंतप्रधांनानी दिलेल्या वचनाला हरताळ फासणारा होता. पुणेकरांची स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवून टाकली. याचा तसेच देशाच्या पंतप्रधानांचा शब्द खोटा ठरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.