...अन् साकारले अनोखे पुस्तक!

By admin | Published: May 6, 2017 02:40 AM2017-05-06T02:40:30+5:302017-05-06T02:40:30+5:30

कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर तर कोणी परिचारिका... आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळून साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या

... a unique book! | ...अन् साकारले अनोखे पुस्तक!

...अन् साकारले अनोखे पुस्तक!

Next

प्रज्ञा केळकर सिंग / लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर तर कोणी परिचारिका... आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळून साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या दृष्टीने ते एकत्र आले... वाचन आणि लेखनावृद्धीसाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला... आठवड्याला एक विषय निवडायचा आणि त्यावर उत्स्फूर्त लेखन करायचे, असे ठरवून त्यांची छान भट्टी जमली आणि पाहता पाहता या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे समूह पुस्तकच साकारले! उत्स्फूर्त लेखनाचा लेखाजोखाच या ग्रुपने ‘शब्दपालवी’ या समूह पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याची पिढी साहित्यापासून दूर चालली आहे, अशी ओरड होत असतानाच सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन आणि लेखनाला चालना देण्याच्या दृष्टीने तरुण पिढी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाच वाचनवेड्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ‘वाचनवृद्धी आणि अनुभवकथन’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. साहित्य, समीक्षा, चित्रपट यांसह इतर अनेक क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी झाले.
एरव्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्हटला, की शुभेच्छा, गुड मॉर्निंगचे मेसेज, फॉरवर्डेड मेसेज यांना ऊत येतो. या ग्रुपने मात्र सुरुवातीपासूनच काही नियम ठरवून घेतले होते. इतर कोणतेही मेसेज पाठवण्यापेक्षा या ग्रुपवर केवळ स्वत:चे लेखन पोस्ट करायचे, असे ठरले. ‘वाचनवृद्धी’साठी ‘लेखनवृद्धी’ आवश्यक असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अ‍ॅडमिनने सर्वांना आठवड्याला एक विषय द्यायचा आणि त्यावर प्रत्येकाने आपल्या सर्जनशीलतेतून निर्मिलेले लेखन ग्रुपवर लिहायचे, असा दंडकच घालून देण्यात आला. आठवड्याभरात जे लिहिणार नाहीत, त्यांना समूहामधून बाहेर काढण्यात आले. न लिहिणाऱ्यांना लिहिते करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या स्पर्धांमधील निवडक लेखनही पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रा. ज्ञानेश्वर भोसले आणि अभिजित सोनावणे यांनी पुस्तकाचे संपादन केले असूून, ना. सी. फडके यांच्या कन्या गीतांजली जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


विषयांचे वैविध्य, भाषेच्या विविध लकबी, आशयाचे अनेक रंग, लेखकांच्या भूमिका, विसंवादातून घडणारा संवाद अशा नानाविध प्रकारचे लेखन ‘शब्दपालवी’मध्ये साकारले आहे. विशेष म्हणजे, पुस्तक छपाईपासून प्रकाशनापर्यंतचा सर्व खर्च समूहामधील सदस्यांनी एकत्र येत पेलला आहे. समूहातील सदस्यांसाठी विनोदी कथा स्पर्धा, माय सिक्स वर्ड स्टोरी अशा अनोख्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
नाशिक, सांगली, नांदेड, औरंगाबाद, पंढरपूर, पुणे, पालघर, नगर, नाशिक, गोवा, दुबई, पश्चिम बंगाल अशा विविध ठिकाणी राहणाऱ्या १७ ते ८० वयोगटातील स्त्री, पुरुष, बहुलिंगी अशा सर्व सदस्यांनी लेखनाचा जणू वसाच घेतला. आॅक्टोबर महिन्यात या समूहवासीयांचे छोटेसे संमेलन पुणे विद्यापीठात पार पडले आणि त्यातूनच समूह पुस्तकाची संकल्पना साकारली आहे.

प्रत्येक वाचकामध्ये एक लेखकही दडलेला असतो. या लेखकाला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न ‘शब्दपालवी’ या पुस्तकातून करण्यात आला आहे. वाचन आणि लेखनवृद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘वाचनवृद्धी आणि अनुभवकथन’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून उदयाला आलेले लिखाण एकत्र करून हे समूह पुस्तक साकारले आहे.
- अभिजित सोनावणे

Web Title: ... a unique book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.