World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:50 PM2018-04-23T12:50:50+5:302018-04-23T12:50:50+5:30
पुण्यातील काेथरुड भागात वारी बुक कॅफे हा एक अागळा वेगळा कॅफे असून येथे तुम्ही तासनतास पुस्तके वाचत बसू शकता. त्याचबराेबर विविध पुस्तकांशी निगडीत अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात.
पुणे : अाजची तरुण पिढी वाचत नाही, साेशल मिडीया, इतर गाेष्टी यांमध्येच ते वेळ घालवत असतात. त्यांची वैचारिक बैठक नसते, अशी अाेरड नेहमीच हाेत असते. परंतु तरुणांना जर समजून घेत त्यांच्या पद्धतीने जर त्यांना पाेषक वातावरण निर्माण केलं, तर ते नक्कीच वाचनाकडे वळतात. अाणि याचच उदाहरण म्हणजे पुण्यातील वारी बुक कॅफे.
वेगवेगळ्या प्रकारचे थिम कॅफे अापल्याला माहित असतात. परंतु पुण्यात असा एक कॅफे अाहे की जिथे तुम्ही तासनतास तुम्हाला हवी ती पुस्तके वाचू शकता. त्याचबराेबर तुम्ही तुमचं एखादं कामही येथे बसून करु शकता. पुण्यातील काेथरुड भागात सती भावे यांनी या कॅफेची निर्मीती केली अाहे. तरुणांना शांत बसून वाचण्यासाठी एखादी त्यांची हक्काची जागा असावी या विचारातून सती भावे यांनी हा कॅफे सुरु केला. बुक कॅफे म्हंटल्यावर काेणी या कॅफेमध्ये येईल का असा प्रश्न त्यांना खरंतर पडला हाेता. मात्र अाता बसायला जागा मिळणार नाही इतकी तरुण मंडळी या कॅफेमध्ये पुस्तके वाचण्यासाठी येत असतात. इथली रचना सुद्धा तरुणांना अावडेल अशीच अाहे. तुम्हाला खुर्चीवर बसायचे असेल तर खुर्चीवर बसा किंवा सरळ पाय पसरून खाली सुद्धा तुम्ही येथे बसू शकता. त्याचबराेबर तुमचं लक्ष लागवं, तुम्ही पुस्तक वाचताना एकाग्र व्हावं यासाठी येथे शास्त्रीय संगीत सुद्धा लावण्यात येते. अाणि हाे पुस्तक वाचताना तुम्हाला काॅफीची जाेड असतेच. काॅफीचा अास्वाद घेत पुस्तकांच्या गराड्यात तरुण मंडळी या कॅफेमध्ये तासनतास विचार मंथन करतात. त्यांच्यासाठी हा कॅफे म्हणजे हक्काची जागाच झाली अाहे. एखाद्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी यापेक्षा उत्तम जागाच नाही असेही काही तरुण सांगतात.
या कॅफेची निर्मीतीबद्दल सांगताना सती भावे म्हणाल्या, तरुणांना वाचनासाठी त्यांच्या पद्धतीच्या हक्काच्या जागेची गरज असते. हीच तरुणांची गरज लक्षात घेत अाम्ही या कॅफेची निर्मीती केली. येथे काेणीही येऊन त्यांना हवं ते पुस्तक घेऊन वाचन करु शकतात. सध्या 3 हजाराहून अधिक पुस्तके या कॅफेमध्ये अाहेत. सध्या विविध समाज माध्यमं असली तरी तरुणांना त्यातून मानसिक समाधान मिळत नाही. पुस्तकांच्या माध्यमातून बुद्धीला चालना मिळत असते. या कॅफेमध्ये तरुण बराच वेळ पुस्तके वाचत बसतात. त्याचबराेबर अनेक सामुहिक पुस्तक वाचनाचे कार्यक्रमही येथे अायाेजित केले जातात. या माध्यमातून एक वाचन संस्कृती रुजविण्याचा अामचा प्रयत्न अाहे.
या कॅफेमध्ये बऱ्याचदा अालेला प्रदीप माळी म्हणाला, पुण्यात मला पहिल्यांदाच असा खास पुस्तकांचा कॅफे पाहायला मिळाला. जेथे तुम्हाला हवी ती पुस्तकं हवा तितका वेळ वाचत बसता येते. त्याचबराेबर मित्रांबराेबर चर्चाही करता येते. हा एक अनाेखा प्रयाेग अाहे. असे कॅफे इतर ठिकाणी सुद्धा तयार व्हायला हवे.
मुक्ता जाेशी म्हणाली, मुळात पुस्तकांचा कॅफे ही संकल्पनाच मला खूप अावडली. येथे येण्यासाठी तुम्हाला काेणाची साेबत लागत नाही. तुम्ही एकटे येऊन तुम्हाला हवं ते पुस्तक वाचू शकता. दाेन कामांच्या मध्ये वेळ असेल तर येथे येऊन तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. पुस्तकांसाेबतच वेगवेगळे खेळही येथे अाहेत. त्याचबराेबर कविता, कथा, नाट्यवाचन असे अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात. पुस्तकांशी निगडीत अनेक गाेष्टी येथे पाहायला मिळतात.