या ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजने वेधले डमरू फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:55 PM2017-12-27T12:55:04+5:302017-12-27T12:57:26+5:30

‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे. ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

'unique' drummer holds the attention of everyone in the Dumro Festival | या ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजने वेधले डमरू फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष

या ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजने वेधले डमरू फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष

Next
ठळक मुद्दे महोत्सावातील ‘चॅम्पियनशिप’साठी देशभरातून ५ वादकांची करण्यात आली निवडड्रमिंगमधील व्यावसायिक शिक्षण घेण्याची तिची इच्छा

पुणे : ड्रमचे पाच पीस वाजवाताना लागणारी ताकद, वादनातील लय, सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाफ... पायाने बेस ड्रम आणि हाय हॅट वाजवतानाच हातांनी साधावा लागणारा समन्वय... वादनासाठी आवश्यक असणारा रियाझ आणि संगीताची साधना अशा वैविध्यपूर्ण अंगांनी विकसित केलेल्या ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे.
अभिनव इंग्रजी माध्यमात शिकणारी अनन्या पाटील अभ्यासातील हुशारी जपत, टेनिस खेळण्याची आवड जपत ड्रमवादनाचे धडे गिरवत आहे. कलेच्याक्षेत्रातील मुलांची अभिरुची कमी होत चालली आहे, अशी कायम होणारी ओरड तिने आपल्या वादनातून खोटी ठरवली आहे. लंडनमधील ट्रिनिटी स्कूल आॅफ म्युझिकच्या सहा परीक्षा देऊन अनन्याने आपल्या कौशल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 
अनन्याची आई वैजयंती पाटील म्हणाल्या, ‘‘१५ वर्षीय अनन्याला लहानपणापासून वाद्यांचे आकर्षण होते. गणेशोत्सव ढोलताशा वादनात सहभागी होण्याची तिची अनावर इच्छा होती. तिने वयाच्या नवव्या वर्षीच ढोलताशा पथकात सहभागी होण्याचा हट्ट धरला. मात्र, वादनापूर्वी एक महिना आधीपासून करावा लागणारा सराव, दहा दिवसांचे वादन, त्यामुळे शाळेला सुटी घ्यावी लागत असल्याने आम्ही तिला पथकात सहभागी होण्यास नकार दिला. अनन्याचा हट्ट कायम होता. तिचे मन वळवण्याच्या दृष्टीने ‘तू ढोलताशा पथकात सहभागी होण्याऐवजी छंद म्हणून एखादे वाद्य शिक,’ असा पर्याय आम्ही तिला सुचवला.’’
आई-वडिलांचे म्हणणे मान्य करून अन्यनाने ड्रम शिकण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी तो हट्ट मान्य करून तिला ड्रमच्या क्लासला घातले. काही दिवस क्लासला गेल्यानंतर ती कंटाळा करेल किंवा थकून जाईल आणि दुसरे वाद्य शिकण्याचा हट्ट धरेल, असे आई-वडिलांना वाटले; मात्र अनन्याची जिद्द कायम होती. ड्रम शिकायला लागली तेव्हा अनन्या १० वर्षांची होती. त्या वेळी पुण्यात नुकतेच फर्टाडोज स्कूल आॅफ म्युझिक सुरू झाले होते. अनन्याने मन लावून वादनाचे सर्व शिक्षण घ्यायला सुरुवात केली. ‘ट्रिनिटी स्कूल आॅफ म्युझिक आॅफ लंडन’च्या ग्रेड परीक्षा द्यायला सुरुवात केली. या स्कूलच्या एकूण आठ ग्रेडपैकी सहा ग्रेडच्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे.’’ डमरू फेस्टिव्हलसाठी अनन्याने ड्रम वादनाची छोटीशी क्लिप पाठवली होती. या महोत्सावातील ‘चॅम्पियनशिप’साठी देशभरातून ५ वादकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेली ती एकमेव मुलगी ठरली आहे. 

ड्रम वाजवताना हात, पाय आणि मेंदू यांच्यातील लयबद्धता साधावी लागते. पायाने बेस ड्रम, हाय हॅट वाजवावे लागतात, तर दोन हातांनी ड्रमचे पाच पीस वाजवावे लागतात. यासाठी खूप ताकद लावण्याची गरज असते. यासाठी अनन्या दररोज दोन तास सराव करते. तिने रशियन कॉन्सोलेटमध्येही वादन केले आहे. मोठेपणी ड्रमिंगमधील व्यावसायिक शिक्षण घेण्याची तिची इच्छा असल्याचा मानस वडील अभिजित पाटील यांनी बोलून दाखवला.

Web Title: 'unique' drummer holds the attention of everyone in the Dumro Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे