राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या अभियंत्याने बनविले अनोखे यंत्र
By admin | Published: February 23, 2016 03:23 AM2016-02-23T03:23:20+5:302016-02-23T03:23:20+5:30
कार्यालयात गेलात... कॉलेजमध्ये गेलात...तर शार्पनर, पंचिंग मशिन, स्टेपलर, स्टॅम्प पॅडसाठी धावपळ करायची गरज नाही. एकाच उपकरणात या सर्व वस्तू आता उपलब्ध आहेत.
पिंपरी : कार्यालयात गेलात... कॉलेजमध्ये गेलात...तर शार्पनर, पंचिंग मशिन, स्टेपलर, स्टॅम्प पॅडसाठी धावपळ करायची गरज नाही. एकाच उपकरणात या सर्व वस्तू आता उपलब्ध आहेत. खिशात किंवा पर्समध्ये बसेल एवढ्या पाकिटाच्या आकाराचे हे उपकरण आहे. ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या आदित्य जगताप याने हे उपकरण कल्पकतेने बनवले आहे.
दैनंदिन जीवनात कामानिमित्त अनेक सरकारी कार्यालयांत विविध कामांसाठी जावे लागते. तेथे गेल्यानंतर कागदपत्रे बनविताना स्टेपलर, पंचिंग किंवा स्टॅम्प पॅड सापडले नाही, तर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. अन्यथा दुकानात जाऊन हे साहित्य विकत घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. घरी हे सर्व साहित्य उपलब्ध असतानाही ते विकत घ्यावे लागते.
यासाठी बहुउपयोगी असे, एकाच साच्यात बसणारे हे उपकरण आदित्यने बनविले आहे. धावपळीच्या प्रसंगी अशी वस्तू खिशात अथवा पर्समध्ये असेल, तर गैरसोय टळू शकते. वेळेचीही बचत होईल.
आदित्यला उपकरण बनविण्याची कल्पना इंजिनिअरिंगचे तिसऱ्या वर्षाचे सबमिशन सुरू असताना आली. या उपकरणांअभावी त्याची आणि मित्रांचीही कॉलेजमध्ये धावपळ उडाली होती. त्याने दोन महिन्यांत हे उपकरण रॉड वापरून बनविले. त्या रॉडमध्ये पंचिंग, स्टेपलर, स्टॅम्प पॅड, तसेच शार्पनर बसविले व सहज-सुलभ ते कसे वापरता येईल, यावर भर दिला आणि ते उपकरण बनविले. उपकरण बनविल्यानंतर त्याने पेटंट मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. अखेर त्याला यश आले आणि त्यासाठी त्याला पेटंटही मिळाले. आदित्यचे वडील आनंद जगताप यांनी त्याला संशोधनात मदत केली. त्याचप्रमाणे आई अंजली जगताप यांनी प्रोत्साहन दिले. उपकरणासाठी हर्षद मगर, गणेश दुधे, सागर सरवदे, प्राध्यापक चोपडे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)