पुण्यातील अनोखे हॉटेल! न बोलता देता येते ऑर्डर, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:40 PM2022-10-07T15:40:53+5:302022-10-07T15:41:09+5:30
शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं....
- मानसी जोशी/किमया बोराळकर
पुणे : शहरातील या हॉटेलात गेल्यावर न बोलताही तुमची ऑर्डर तुमच्या टेबलावर येते. सांकेतिक भाषेतून ऑर्डर घेण्याचे काम दिव्यांग येते करतात. हे हॉटेल एफसी रस्त्यावर असून त्याचे नाव ‘टेरासीन’ आहे. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ‘टेरासीन’ची कल्पना सुचली. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं, या उदात्त हेतूने हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. 12 दिव्यांग मुले या रेस्टाॅरंटमध्ये कार्यरत आहेत. तसेच इतर 51 मुलांना डॉ. सोनम कापसे या प्रशिक्षण देत आहेत.
विशेष म्हणजे या हॉटेलच्या भिंतींवर तसेच मेन्युकार्डवर सांकेतिक भाषा वापरली आहे. ज्याचा वापर करून ग्राहक ऑर्डर देऊन जेवण किंवा पेय मागवू शकतात. दिव्यांगकडून चालवले जाणारे टेरासीन हॉटेल देशातील एकमेव आहे. ‘टेरासीन’ म्हणजे पृथ्वी आणि अन्न यांचे मिलन. याचमुळे या रेस्टाॅरंटमध्ये न्यूट्रिशनयुक्त पदार्थ पुरवले जातात. हे न्यूट्रिशन युक्त पदार्थ पुरविण्यासाठी 200 शेतकरी या रेस्टाॅरंटसोबत जुळले गेले आहेत. ऑर्डर देण्यासाठी मेन्युकार्डमध्ये सांकेतिक भाषेचा वापर केला आहे. ज्यामध्ये बोटांद्वारे अक्षर दाखवून मेन्युकार्डवरील डिश क्रमांक सांगून पदार्थ ग्राहक मागवू शकतात, अशी माहिती डॉ. सोनम कापसे यांनी दिली.
सर्व दिव्यांग शेतकरी कुटुंबातील-
येथील प्रत्येक दिव्यांग वेटर हा शेतकरी कुटुंबातील आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी डॉ. सोनम कापसे या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना पूरक असे वातावरण निर्मिती करत आहेत. सोबतच त्यांचे शिक्षण, राहण्याची सोय तसेच त्यांची सुरक्षा आणि वाहतुकीची जबाबदरी यांची पुरेपूर काळजी देखील डॉ. सोनम कापसे यांनी घेतली आहे. समाजभान जपणाऱ्या या रेस्टाॅरंटला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : या हॉटेलात सांकेतिक भाषेत द्यावी लागते ऑर्डर, इथले सर्व वेटर दिव्यांग#Pune
— Lokmat (@lokmat) October 7, 2022
(व्हिडीओ- किमया बोराळकर) pic.twitter.com/2JykI79YOb