पुणेकर मशिदीच्या भेटीला, आझम कॅम्पसमध्ये आगळा वेगळा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:35 AM2018-12-17T01:35:12+5:302018-12-17T01:36:11+5:30
आझम कॅम्पसमध्ये आगळा वेगळा उपक्रम : तीनशेहून अधिक नागरिकांनी जाणून घेतले मशिदीचे अंतरंग
पुणे : रविवारचा दिवस पुणेकरांसाठी आनंदाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला. कारण तीनशेहून अधिक नागरिकांनी मशिदीत जाऊन तिचे अंतरंग जाणून घेतले. पुण्यातील इस्लामिक रीसर्च सेंटरकडून हा उपक्रम झाला. या संस्थेतर्फे ‘व्हिजिट अवर मॉस्क’ हा दोन दिवसीय आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांना मशिदीची संपूर्ण माहिती थेट मशिदीत जाऊन देण्यात आली. भेट दिलेल्या नागरिकांना यावेळी इस्लाम धर्म, त्याची शिकवण, त्याचे महत्त्व सांगण्यात आले. नागरिकांनीदेखील मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन या सर्व गोष्टी समजावून घेतल्या. तसेच हा उपक्रम सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पस मशिदीमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इस्लामच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेची माहिती लोकांना देण्यात आली. वजू म्हणजे काय? नमाज म्हणजे काय? अजान म्हणजे काय? काबा कशाला म्हणतात यासारख्या इस्लाममधील प्रचलित बाबी लोकांना समजावून सांगत त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनाही मशिदीत खुला प्रवेश देण्यात आला. अनेकांनी कुराणबद्दल माहिती आवर्जुन जाणून घेतली. या उपक्रमात विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. मुस्लिमधर्मीय प्रार्थनास्थळाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या मशिदीला भेट देणारी अंकिता आपटे म्हणाली, या उपक्रमामुळे इस्लाम धर्माबाबत असलेले गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना दूर होण्यास मदत झाली. यातून नवीन माहिती मिळाली.
मशिदीबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज...
या उपक्रमाबाबत बोलताना इस्लामिक रीसर्च सेंटरचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, लोकांनी मशिद आतून कशी असते, हे कधी पाहिले नव्हते. मशिदीमध्ये नेमके काय असते याबाबत नागरिकांमध्ये
कुतुहूल होते. त्याचबरोबर अनेकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मशिदीबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. तसेच मशिदीबाबतच्या त्यांच्या सर्व शंका दूर करण्यात आल्या. पुण्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला होता. यापुढेही असा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे.