पुण्यातील युवतीने साकारली शिवछत्रपतींची नयनरम्य रांगोळी; मोडी लिपीतून १ लाख वेळा ‘जाणता राजा’ लिहिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:50 PM2022-04-29T14:50:47+5:302022-04-29T14:51:31+5:30
मोडी लिपीतून १ लाख ११ हजार १११ वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी
पुणे : पुण्याच्या श्रुती गावडे यांनी मोडी लिपीतून १ लाख ११ हजार १११ वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी साकारली. या अनोख्या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्ड’ मध्ये नोंद झालीये. मोडी लिपीच्या प्रसारासाठी मागील काही वर्षांपासून श्रुती काम करतेय. सलग २३ तास मेहनत घेत तब्बल बाराशे चौरस फुटाची ही रांगोळी साकारली आहे.
श्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहेत. पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वर, व्यंजन वापरून बनवलेले हेल्मेट खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी दुचाकी देखील मोडी लिपीतून बनवली. मुलांना मोडी लिपीची गोडी लागावी, त्यांना ही लिपी समजावी यासाठी श्रुती यांनी मोडीतून अक्षर चकल्या बनवल्या. चहाचे कप, कॅलेंडर असे अनेक उपक्रम त्यांनी आजवर मोडीच्या प्रसारासाठी राबवले आहेत.
वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
श्रुति करत असलेल्या कामाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये व्हावी, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाल्यानं श्रुतिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालंय. आपली भाषा कालपरत्वे अडगळीला पडते की काय असं वाटत असतानाच, श्रुती गावडे यांचा हा उपक्रम मोडी लिपीची साक्षरता दर्शवणारा आहे.