‘नाट्य फंदी’तून दिग्गज भगिनी उलगडणार संगीत नाटकांचा अनोखा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:03+5:302021-04-05T04:09:03+5:30

पुणे : अमृताते ही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचे सौंदर्य... अत्तरासारखे दरवळणारे स्वर... आणि नाट्य अशा सुंदर गोफातून सजलेला ...

The unique journey of musicals will unfold through 'Natya Fandi' | ‘नाट्य फंदी’तून दिग्गज भगिनी उलगडणार संगीत नाटकांचा अनोखा प्रवास

‘नाट्य फंदी’तून दिग्गज भगिनी उलगडणार संगीत नाटकांचा अनोखा प्रवास

Next

पुणे : अमृताते ही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचे सौंदर्य... अत्तरासारखे दरवळणारे स्वर... आणि नाट्य अशा सुंदर गोफातून सजलेला ‘नाट्यफंदी’ कार्यक्रम अनुभवण्याची संधी संगीत नाट्यप्रेमी मंडळींना मिळणार आहे. संगीत नाटकांच्या परंपरेमधील महत्वपूर्ण कडी असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी-गायिका कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले या त्यांचा संगीत नाटकाचा गेल्या ६० वर्षांचा अनोखा प्रवास या कार्यक्रमातून मांडणार आहेत. लहानपणापासून लाभलेलं संगीत नाटकांचं लेणं अन या संगीत नाटकांनी दिलेली ओळख... असं सारं काही गप्पांमधून, चिंतनातून अन आठवणीतून त्या उलगडणार आहेत. गुढीपाडव्याला येत्या १३ एप्रिल रोजी कार्यक्रमाचा पहिला भाग फेसबुकवर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे संगीत नाटकांचे डॉक्युमेंटेशनच म्हणता येईल!

माजी नाट्यसंंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी समर्थ अभिनयासह अद्वितीय गायकीने संगीत नाटकांत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दीप्ती देखील याच सांगीतिक परंपरेच्या पाईक. दोन्ही भगिनींनी मिळून संगीत नाटकाला वेगळ्या उंचीवर नेले... त्यांच्या या प्रवासाची गुंफण ‘नाट्यफंदी’ या ऑनलाइन कार्यक्रमातून पाहता येणार आहे. याविषयी ‘कीर्ती शिलेदार म्हणाल्या, आम्हाला आई-वडिलांकडून संगीत नाटकांचा वारसा लाभला. त्यांच्यामुळे आम्हाला दोघींना संगीत नाटकांविषयी ममत्व निर्माण झाले. या कार्यक्रमात संगीत नाटकांचा एक प्रवास पाहायला मिळणार आहे.

दीप्ती भोगले म्हणाल्या, संगीत नाटकांचे स्वरूप प्रेक्षकांपर्यंत पोचावे हा आमचा उद्देश आहे. संगीत नाटक हे संगीत, साहित्य आणि नाट्य या तिन्ही गोष्टींचा संगम आहे. संगीत नाटकातून आम्हाला जे अनुभव मिळाले, जे शिकता आले, त्यांच्यामुळे आम्हाला नाटक करताना जो आनंद होत गेला तो आनंद आम्हाला वाटायचा आहे. काळाच्या चाळणीत आतापर्यंत खूप थोडी संगीत नाटके टिकली आहेत. जी टिकली त्यात सर्वकाही एकजीव झाले. म्हणून ते टिकले. नुसते गाणी म्हणून संगीत नाटक होत नाही. संगीत नाटकात संगीत, साहित्य आणि नाट्य हे एकत्र चालले पाहिजे. संगीत नाटक हे चिरंतर काळ टिकावे, हे अदभूत लेणं प्रेक्षकांपर्यंत पोचावे हा आमचा उद्देश आहे.

प्रकट चिंतन गप्पांच्या स्वरूपात पाहायला मिळणार

संगीत नाटकातून वातावरण निर्मिती कशी होते हे सांगण्यासाठी आम्ही दोघी एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर करणार आहोत. माझे आणि कीर्तीचे संगीत नाटकातील प्रकट चिंतन गप्पांच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच आम्ही काम केलेल्या संगीत नाटकातील जुने व्हिडीओ, ऑडिओ आणि छायाचित्रेही पाहता येतील. काही आठवणीही आम्ही गुंफणार आहोत. माझ्याकडे तीन पिढीतील संगीत नाटकाची छायाचित्रे आहेत. तो खजिनाही प्रेक्षकांना दाखविण्याचा प्रयत्न असणार आहे.

Web Title: The unique journey of musicals will unfold through 'Natya Fandi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.