लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत; पंजाबची प्रेयसी अन् भिगवणच्या प्रियकराची अनोखी "प्यारवाली लव्ह स्टोरी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 21:31 IST2021-08-13T21:30:31+5:302021-08-13T21:31:31+5:30
पंजाब राज्यातील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही स्टोरी...

लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत; पंजाबची प्रेयसी अन् भिगवणच्या प्रियकराची अनोखी "प्यारवाली लव्ह स्टोरी"
भिगवण : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानले जाते. मात्र, मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तेही जातपात ,धर्म, प्रांत आणि भाषा यांना फाटा देत पंजाब राज्यातील तरुणी महाराष्ट्र राज्यातील तरुणाच्या प्रेमात पडली. इतकंच काय पंजाबमधील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही ''प्यारवाली लव्ह स्टोरी''पाहून पोलिसांनी पण कपाळाला हात लावला.
मिळलेल्या माहितीनुसार, मोबाईल लुडो गेम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भिगवण गावच्या १९ वर्षाच्या तरुणाची ओळख पंजाब राज्यात राहणाऱ्या तरुणीशी झाली. ओळखीतून एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होत त्याचे रुपांतर प्रेमात झाले.मग पुढं काय सुरु झालेल्या चॅटिंगमध्ये या दोन प्रेमी युगुलाने एकत्र येण्याचे ठरविले. प्रेमिका पंजाबपासून निम्मे अंतर पार करून आली तर प्रियकराने निम्मे अंतर पार करत प्रेमिकेला आपल्या घरी घेवून आला. प्रेमिकेच्या घरच्यांनी शोध घेत पंजाबपासून भिगवणला धडक मारली.
भिगवण येथे आलेल्या पंजाबच्या नातेवाईकांनी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रेमी युगुलाला त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.यावेळी पोलीस ठाण्यातील वातावरण एकदम तंग झाल्याचे दिसून आले.मुलीच्या बाजूने आलेली माणसे धड धाकट असल्यामुळे आणि यातून काही वादाचा प्रसंग येवू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे काम केले.
मुलीच्या वडिलांनी अनेक प्रयत्न करूनही मुलगी आपल्या प्रियकरासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. आता मुलगी २१ वर्षाची असल्यामुळे कायद्यानुसार तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर मुलगा १९ वर्षाचा असला तरी त्याने तिच्याशी लग्न केले नसल्यामुळे कोणतीच कारवाई पोलिसांना करणे शक्य नव्हते. मग काय भिगवण पोलीस या प्रेमी युगुलाच्या बाजूने उभे राहत मुलीच्या नातेवाईकांना समजूत घालत परत पाठविण्यास यशस्वी झाले.त्यामुळे अखेर पंजाबची प्रेयसी आणि भिगवणचा प्रियकर लिव्ह इन रिलेशन मध्ये घरी राहण्यासाठी गेले.
प्रचलित कायद्यानुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. तर १९ वर्षाच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते 'लिव्ह इन रिलेशन' मध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही. त्यामुळे यात कारवाई काय करावी हे भिगवण पोलिसांनाही समजेनासे असल्याचे दिसून आले.