मनोरुग्णांनी दिला अनोखा संदेश
By Admin | Published: September 12, 2016 02:30 AM2016-09-12T02:30:21+5:302016-09-12T02:30:21+5:30
भावना सांभाळा मनोविकार टाळा’ असा संदेश देत मनोरुग्ण सादरीकरणात रमले. पथनाट्य आणि गाणी सादर करत ‘काही बोलायचे आहे
पुणे : ‘भावना सांभाळा मनोविकार टाळा’ असा संदेश देत मनोरुग्ण सादरीकरणात रमले. पथनाट्य आणि गाणी सादर करत ‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही’, असे मानसिक आजारांसाठी उपचार घेणाऱ्या मनोरुग्णांनी सांगितले. निमित्त होते, परिवर्तन संस्थेने रविवारी आयोजिलेल्या मानसरंग कार्यक्रमाचे.
मानिसक आजारांविषयी समाजप्रबोधन करण्यासाठी मानसरंग नावाच्या नाट्य व्यासपीठाची निर्मिती परिवर्तन संस्थेने केली आहे. तसेच मानसिक आरोग्याविषयी प्रबोधन करण्यासाठी पोस्टरची निर्मितीही ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून केलेली आहे. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सुदर्शन रंगमंच येथे जागतिक मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष प्रा. हेलन हर्मन यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध अभिनेते, मनोविकारतज्ज्ञ मोहन आगाशे, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, चित्रकार जयंत जोशी, कुमार गोखले, परिवर्तन संस्थेच्या शमिका बापट, डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवारीही खुले आहे.
अंधारातून प्रकाशाकडे या पथनाट्यातून मनोविकार झालेल्या रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेऊन व्यवस्थित व्हावे, असा संदेश दिला. मनोविकार झालेला एक नागरिक रस्त्यावर फिरत गाणी म्हणत असतो. त्याला सिगारेटचे व्यसन असते. तसेच तो देव-देवही करत असतो, पण तो आजारातून बरा होत नाही. शेवटी त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्याने तो बरा होतो, असा संदेश मनोरुग्ण कलाकारांनी दिला.
(प्रतिनिधी)