वसुंधरेला साथ देण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह अधिकारी नागरिकांनी घेतली अनोखी शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:44+5:302021-02-17T04:15:44+5:30
इंदापूर शहरातील घराघरांतील नागरिकांनी, आपल्या वसुंधरेला भक्कम साथ देण्यासाठी, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा व ऊर्जा बचत ...
इंदापूर शहरातील घराघरांतील नागरिकांनी, आपल्या वसुंधरेला भक्कम साथ देण्यासाठी, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा व ऊर्जा बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा. तरच वसुंधरेला आपण भक्कम साथ देतोय हे सिद्ध होईल, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई मुकुंद शहा यांनी केले.
इंदापूर नगर परिषदेच्या वतीने वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील प्रांगणामध्ये सायकल विक्री स्टॉल, वृक्षविक्री स्टॉल, सौरऊर्जा दिवा विक्री स्टॉल व सोलर पॅनल विक्री स्टॉल उभारण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, अल्ताफ पठाण, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के, गोरक्षनाथ वायाल, सहायक आरोग्य निरीक्षक लीलाचंद पोळ, सुनील लोहिरे, अशोक चिंचकर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित नागरिकांना माझी वसुंधराची शपथ श्रद्धा वळवडे यांनी दिली. सोलर वॉटर हीटरसाठी विश्व एजन्सिज प्रोप्रायटर शैलेश घोरपडे यांनी स्टॉल उभा केला होता. वृक्षविक्रीसाठी देशपांडे नर्सरीचे उदय देशपांडे यांनी स्टॉल उभा केला होता. सोलर एलईडी लाईट विक्रीसाठी दिनकर गायकवाड यांनी स्टॉल उभा केला होता. सायकल विक्रीसाठी सोनल सायकलचे संचालक शिंदे यांनी विक्रीसाठी अद्ययावत स्टॉल निर्माण केला होता. प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक: १६ इंदापूर नगरपरिषद स्टॅाल उद्घाटन
फोटो ओळी : वसुंधरा अभियानांतर्गत विविध स्टॉलचे उद्घाटन करताना नगराध्यक्षा अंकिता शहा.